७१ वर्षांनंतरही उल्हासनगर भकासच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 12:42 AM2020-08-08T00:42:33+5:302020-08-08T00:43:11+5:30
आज वर्धापन दिन : विकासाच्या नावाने बोंब
सदानंद नाईक ।
उल्हासनगर : शहर स्थापनेला शनिवारी ७१ वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, इतक्या वर्षांत विकासाच्या नावे बोंब असून शहर भकास झाल्याचे चित्र दिसत आहे. शहराचा ऐतिहासिक शिलालेख तरणतलाव येथे ठेवण्यात आला असून वर्धापनदिनी शिलालेखाची आठवण नेत्यांना होते.
देशाच्या फाळणीवेळी विस्थापित झालेल्या बहुसंख्य सिंधी बांधवांना कल्याणशेजारील ब्रिटिशकालीन लष्करी छावणीच्या बॅरेक व खुल्या जागेवर वसविण्यात आले. विस्थापितांच्या वस्तीचे देशाचे पहिले गव्हर्नर सी. गोपालचारी यांनी ८ आॅगस्ट १९४९ रोजी उल्हास नदीवरून उल्हासनगर नामकरण केले. उद्या शहर ७१ वर्षांचे होत आहे. व्यापारी हबमुळे शहराचे नाव राज्यात नव्हे तर देशात प्रसिद्ध आहे. मात्र, इतर शहरांच्या तुलनेत विकास होण्याऐवजी भकासच झाले आहे. महापालिकेला टी. चंद्रशेखर, आर.डी. शिंदे, रामनाथ सोनवणे, मनोहर हिरे, सुधाकर देशमुख यांच्यासारख्या आक्रमक आयुक्तांची गरज आहे. मात्र, महापालिकेला बहुतांश आयुक्त हे केबिनमध्ये बसून गाडा हाकणारे मिळाल्याने शहराचा विकास खुंटल्याची टीका होत आहे. तसेच प्रतिनियुक्तीवरील अधिकारी महापालिकेला देत नसल्याने वर्ग-१ व २ च्या अधिकाऱ्यांच्या ८० टक्के जागा रिक्त आहेत. यामुळे स्थानिक अधिकाऱ्यांची मक्तेदारी वाढल्याने शहर विकासापासून दूर आहे.
शहरातील प्रसिद्ध जीन्स मार्केटला केव्हाच घरघर लागली असून इतर मार्केटची दुरवस्था झाली आहे. बेकायदा बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया ठप्प पडली असून रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. वालधुनी नदीकिनारी अतिक्रमण वाढले आहे. राजकीय नेत्यांचा पालिका कारभारात हस्तक्षेप वाढल्याने कोणताही अधिकारी प्रतिनियुक्तीवर येत नाही, अशी येथील परिस्थिती आहे. स्थानिक अधिकाºयांची मक्तेदारी वाढून ते राजकीय नेत्यांच्या हातचे बाहुले बनल्याची टीका होत आहे.
शिलालेखाचे होणार पूजन
शहराचे नामांतर झालेल्या ऐतिहासिक शिलालेखाचे दरवर्षीप्रमाणे पूजन करणार असल्याची माहिती वालधुनी बिरादरीचे शशिकांत दायमा यांनी दिली. जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांनी आयुक्तांच्या आदेशानुसार कोरोनामुळे कार्यक्रम होणार नसल्याचे स्पष्ट केले.