जमीन दानपत्रानंतरही पाणीयोजना रखडल्या, नवे केटी बंधारे मात्र कोरडे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 01:20 AM2019-05-29T01:20:48+5:302019-05-29T01:20:54+5:30
जिल्ह्यात पाणीटंचाईच्या समस्येने ग्रामस्थ हैराण आहेत. पाण्यासाठी सदस्यांना ग्रामस्थ धारेवर धरत आहेत.
ठाणे : जिल्ह्यात पाणीटंचाईच्या समस्येने ग्रामस्थ हैराण आहेत. पाण्यासाठी सदस्यांना ग्रामस्थ धारेवर धरत आहेत. ‘लोकमत’नेही दुष्काळदाह मालिकेद्वारे जिल्ह्यातील पाणीटंचाईची भीषणता चव्हाट्यावर आणली आहे. पाणीपुरवठा योजनांसाठी ठिकठिकाणच्या गावकऱ्यांनी जमिनी दान केलेल्या आहेत. तसे दानपत्रही दिले आहे. पण, निष्काळजीमुळे योजना मार्गी लागल्या नसल्याचा आरोप सदस्यांनी केला. गावांमध्ये लावलेल्या बोअरिंगही फेल गेल्या. तज्ज्ञ असूनही हा खर्च निष्फळ जात असल्याची खंत सोमवारी सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत व्यक्त केली.
भिवंडी, कल्याण, अंबरनाथमधील पाणीपुरवठा योजनांसाठी संबंधित जमीनमालकांनी जमिनीचे दानपत्र दिले आहेत. पण, योजनेला विलंब होत असल्याने ते त्यास जुमानत नाही. त्यांच्या सत्यप्रतिज्ञापत्रास अनुसरून ग्रामीण पाणीपुरवठा विभाग योजना मार्गी लावू शकतात. अधिकारी कळकळीने काम करत नसल्याने योजना सुरूच झाल्या नसल्याची खंत कल्याण व भिवंडीच्या सदस्यांनी व्यक्त केली. या अभियंत्यांच्या दुर्लक्षामुळे ६० ते ७० लाख खर्चाच्या विहिरी झाल्या नसल्याचे कैलास जाधव या सदस्याने सभागृहाच्या निदर्शनात आणून दिले.
पाणीटँकरची तिप्पट नोंद
नवी मुुंबई परिसरातील १४ गावे जिल्हा परिषदेची आहेत. परंतु, त्यांना पाणीच मिळत नसल्याचे सदस्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेकडून पाणीटंचाई दूर होत नसल्याचा अनुभव असल्याचे सदस्यांनी वैतागून सांगितले. १९७०-७५ मध्ये बांधलेल्या पाझर तलावातून गावकऱ्यांना काही ठिकाणी पाणी मिळत आहे. पण, सध्या बांधलेल्या तलावातून, केटी बंधाºयातून पाणी मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. यासाठी निकृष्ट दर्जाची कामे कारणीभूत असल्याचे नमूद करण्यात आले. आताही टँकरने होणारा पाणीपुरवठा ही धूळफेक आहे. एक टँकर अर्धाअर्धा तीन पाड्यांमध्ये टाकला जात आहे आणि त्याची नोंद तीन टँकर म्हणून केली जाते.
>शहापुरात १५ पैकी १० बोअरिंगना पाणी
टँकरद्वारे आणलेले आठ हजार लीटर पाणी कोरड्या विहिरीत टाकताच त्यातील सहा हजार लीटर पाणी विहीर शोषून घेते. उर्वरित राहिलेले दोन हजार लीटर पाणी विहिरीतील गाळामुळे गढूळ होत असल्याचे वास्तव सदस्यांनी सभागृहात कथन केले. ज्येष्ठ सदस्या वंदना भांडे यांच्या गावात कृत्रिम पाणीटंचाई असल्याची गंभीर बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणली.ग्रामपंचायतीच्या कृपाशीर्वादाने पाइपलाइनवर अनधिकृत कनेक्शन केले आहे. यामुळे पाणी मिळत नसल्याने विकत घ्यावे लागत असल्याचेही भांडे यांनी सांगितले. शहापूर तालुक्यात १५ बोअरिंग लावल्या. त्यातील १० बोअरिंगला पाणी लागल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. दोन ठिकाणी हातपंप बसवल्याचे सांगितले जात आहे.
>या मुद्यांवर झाली चर्चा
केटी बंधारे, कोरड्या तलावातील गाळ काढून घेणे गरजेचे
२०० फुटांची बोअरिंग मारल्यामुळे नाहक निधी खर्च
फार्महाउसवाल्यांप्रमाणे ६०० फुटांवर बोअरिंला परवानगी द्या
सदस्याच्या सांगण्यावरून टँकर सुरू होत नाही तर मंत्र्यांच्या भेटीनंतर टँकर सुरू होतो.
पालकमंत्र्यांना भेटल्यानंतर टँकर सुरू केल्याची खंत