पावसाळा सुरु झाल्यानंतरही त्या ४१ धोकादायक इमारती कारवाईच्या प्रतिक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 05:30 PM2018-07-11T17:30:18+5:302018-07-11T17:33:09+5:30
पावसाळ्यापूर्वी पालिकेने धोकादायक इमारतींची यादी जाहीर करुन त्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आता पावसाने शहरात जोरदार हजेरी लावल्यानंतरही शहरात ४१ इमारती या कारवाईच्या प्रतिक्षेत आहेत.
ठाणे - मागील चार दिवसापासून शहरात पावसाने चांगलाच धुडघुस घातला आहे. असे असताना ठाणे महापालिकेच्या हद्दीमध्ये आजही ४१ इमारती अशा आहेत, ज्या रिमाक्या करणे आवश्यक असताना देखील या इमारती रिकाम्या करणे प्रशासनाला शक्य झालेले नाही. रिकाम्या न करण्यात आलेल्या बहुतांश इमारतींवर न्यायालयाची स्थगिती असल्याने पालिका प्रशासन देखील अशा इमारतींवर कारवाई करण्यासाठी हतबल आहे. मात्र भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास प्रशासनालाच जबाबदार धरले जाऊ शकते, त्यामुळे पालिका दुहेरी कात्रीत अडकली आहे. कारवाई करणे शिल्लक असलेल्या अतिधोकादायक इमारतींमध्ये सर्वाधिक ८ इमारती या नौपाडा आणि कोपरी परिसरात असून त्यानंतर ३ इमारती या मुंब्रा प्रभाग समितीच्या हद्दीमधील आहे.
धोकादायक असतानाही घरे न सोडण्याच्या मानिसकतेमुळे भिवंडीमधील ८ लोकांना दोन वर्षांपूर्वी आपला जीव गमवावा लागला होता. दरम्यान शासनाने धोकादायक इमारतींच्या संदर्भात ठरवून दिलेल्या धोरणानुसार चार श्रेणीमध्ये विभागणी करण्यात आली असून यामध्ये सी १ आणि सी २ ए या दोन श्रेणीमधील इमारती खाली करणे महत्वाचे आहे. सी १ या श्रेणीमध्ये अतिधोकादायक इमारती येत असून त्या तात्काळ खाली करून पाडणे अपेक्षित आहे. तर सी २ ए श्रेणीमधील इमारती या खाली करून दुरु स्त करणे अपेक्षित आहे. मात्र अजूनही अतिधोकादायक अर्थात सी १ श्रेणीमध्ये ११ अतिधोकादायक इमारती तर सी २ बी मध्ये ३१ अशा इमारती आहेत ज्यामध्ये अजूनही नागरिक वास्तव्यास आहेत. ११ अतिधोकादायक इमारतींमध्ये ८ इमारती या नौपाडा तसेच कोपरी प्रभाग समितीच्या हद्दीमधील आहेत. यामध्ये तीन इमारतींवर न्यायालयालायीन स्थगिती असून तीन इमारतींचे दुरु स्तीचे काम सुरु आहे. मुंब्रा प्रभाग समितीच्या हद्दीमध्ये असलेल्या तीन इमारतींपैकी दोन इमारतीं या ७० टक्के रिकाम्या करण्यात आल्या असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
सी २ बी श्रेणीमधील इमारतींपैकी वर्तक नगर प्रभाग समितीच्या हद्दीमध्ये ७, उथळसर २, लोकमान्य -सावरकर नगर २, नौपाडा कोपरी मध्ये ७ तर मुंब्रा प्रभाग समितीच्या हद्दीमध्ये १३ इमारतींचा समावेश आहे. यामध्ये नौपाडा कोपरी प्रभाग समतिीच्या हद्दीमधील ७ इमारतींपैकी १ इमारत तोडण्यात आली आहे तर दोन इमारती तोडण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे. ठाणे महापालिकेच्या अतिक्र मण विभागाने शहरातील अतिधोकादायक अशा एकूण ९५ इमारती जाहीर केल्या होत्या. यामध्ये आतापर्यंत ८४ इमारती रिकाम्या करण्यात आल्या असून २१ इमारती पाडण्यात आल्या आहेत. बहुतांश इमारतींना न्यायालयालायीन स्थगिती असल्याने अजूनही ११ इमारतींवर प्रशासनाला कारवाई करता आलेली नाही. तर सी ए श्रेणीमधील ११५ इमारती जाहीर करण्यात आल्या होत्या. यामध्ये ८४ इमारती रिकाम्या करण्यात आल्या असून ३८ इमारती या दुरु स्त करण्यात आल्या आहेत. मात्र अजूनही ३१ इमारती प्रशासनाच्या वतीने रिकाम्या करण्यात आलेल्या नाहीत.