सात वर्षांनंतरही साकरमाचीचे पुनर्वसन नाही; कुडाच्या शेडमध्ये ग्रामस्थांचे वास्तव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 01:05 AM2020-10-16T01:05:58+5:302020-10-16T01:06:19+5:30
मुरबाड तालुक्यात आसरा : वन्यप्राण्यांमुळे भीतीचे वातावरण
श्याम राऊत
मुरबाड : पुणे जिल्ह्यातील माळीण गावातील दुर्घटना घडल्यानंतर भीमाशंकर अभयारण्यातील साकरमाची प्रकाशझोतात आली. एरव्ही, कुणाच्या खिजगणतीला नसलेल्या या वस्तीला मुरबाड तालुक्याच्या शेजारील लांबाचीवाडी येथे तात्पुरते पत्र्याचे, कुडाचे शेड उभे करून आधार दिला आहे. सात वर्षे होत आली, तरी अद्याप पुनर्वसन न झाल्याने रहिवाशांना वन्यप्राणी, साप, विंचवांच्या सान्निध्यात राहण्याची वेळ आली असल्याचे महिलांनी ‘लोकमत’ला सांगितले.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण गावावर मातीचा डोंगर कोसळून गाव गाडले गेले. येथील निसर्गाचा कोप पाहून माळीणप्रमाणेच भीमाशंकर अभयारण्यातील साकरमाची गावालाही धोका होता. कागदावर हे गाव पुणे जिल्ह्यात दाखवले जात असले, तरी व्यवहार मुरबाड तालुक्यातच होतात. माळीणची घटना घडली आणि सरकारला जाग येऊन येथील २० ते २५ कुटुबांचे तात्पुरते पुनर्वसन मुरबाड येथील लांबाचीवाडी येथे केले. साधी पत्र्याची शेड उभी केली. सात वर्षे होत आली तरी कायमची व्यवस्था होत नसल्याने आजही त्या कुटुंबांवर श्वापदे, साप, विंचू यांच्या सान्निध्यात राहावे लागत आहे.
लांबाचीवाडी येथे तात्पुरत्या निवासाची सोय आहे. पण, रोजंदारीचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यातच कोरोनामुळे रोजंदारी मिळणे दुरापास्त झाले आहे. रेशनवर मिळणाºया तुटपुंज्या धान्यावर गुजराण करावी लागत आहे. या ग्रामस्थांची पुनर्वसनाची जबाबदारी पुणे जिल्हा प्रशासनाची असल्याने, तसा प्रस्ताव मुरबाडचे वनक्षेत्रपाल विकास भामरे यांनी मंजुरीसाठी पाठवला आहे. सरकार कधी मंजुरी देते याकडे स्थानिक प्रशासन आणि ग्रामस्थ यांचे लक्ष लागले आहे.
साकरमाची येथील विस्थापितांचे पुनर्वसन पुणे जिल्हा प्रशासनाच्या अखत्यारित येते. तसा प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे. लॉकडाऊनमुळे त्यांचे पुनर्वसन रखडले. परंतु, लवकरच त्यांचा प्रश्न सुटेल. - विकास भामरे, वनक्षेत्रपाल, मुरबाड पूर्व