दुरुस्तीवर सात कोटी खर्चूनही पोलिसांच्या घरांना गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:47 AM2021-09-04T04:47:58+5:302021-09-04T04:47:58+5:30
ठाणे : ठाण्यातील जरीमरी येथील पोलीस वसाहतीच्या दुरुस्तीसाठी सात कोटींचा निधी मंजूर करूनही येथील इमारतींमधील घरांमध्ये मल:निसारण (ड्रेनेज) वाहिनीची ...
ठाणे : ठाण्यातील जरीमरी येथील पोलीस वसाहतीच्या दुरुस्तीसाठी सात कोटींचा निधी मंजूर करूनही येथील इमारतींमधील घरांमध्ये मल:निसारण (ड्रेनेज) वाहिनीची गळती आणि पडके स्लॅब आढळले आहेत. यामुळे नित्कृष्ट काम करणाऱ्या ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनाही काळ्या यादीत टाकण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी शुक्रवारी केली.
ठाणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या वसाहतीध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस कुटुंबीय वास्तव्याला आहेत. याच वसाहतीच्या दुरुस्तीसाठी केळकर यांच्या पाठपुराव्यानंतर दोन वर्षांपूर्वीच सात कोटींचा निधी राज्य शासनाने मंजूर केल्यानंतर मे २०२१ मध्ये तिच्या दुरुस्तीला सुरुवात झाली. तरीही येथील इमारतींमधील ड्रेनेज वाहिनींमध्ये गळती सुरूच आहे. त्याचबरोबर शौचालय आणि बाथरूममधूनही गळतीसारख्या समस्यांना येथील रहिवाशांना तोंड द्यावे लागत आहे. काही घरांमध्ये तर स्लॅबचे सिमेंट निखळल्यामुळे पडक्या स्लॅबच्या दुरवस्थेमध्ये पोलीस कुटुंबीयांना वास्तव्य करावे लागत आहे. या दुरुस्तीच्या कामाचा पाहणी दौरा शुक्रवारी केळकर यांनी केला. याच दौऱ्यामध्ये पोलीस कुटुंबीयांनी बांधकाम खाते आणि ठेकेदाराविरुद्ध निकृष्ट आणि अर्धवट कामाबद्दल खेद व्यक्त केला. अनपेक्षितपणे ते पाहणीसाठी गेल्यामुळे वस्तुस्थिती चव्हाट्यावर आली. यातूनच सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी, तसेच ठेकेदारांचा गैरकारभारही समोर आला. वेळीच पाहणी केल्यामुळे आता दर्जेदार काम करावेच लागेल; अन्यथा कारवाई होईल. शिवाय आपलेही या कामावर लक्ष राहणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. यावेळी माजी नगरसेवक संतोष साळवी, तसेच पोलीस कुटुंबीय उपस्थित होते.