‘फास्टॅग’ लावूनही वाहनचालकांना करावा लागतोय वाहतूक कोंडीचा सामना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:59 AM2021-02-23T04:59:52+5:302021-02-23T04:59:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी प्रत्येक वाहनाला फास्टॅगची सक्ती केलेली आहे. असे असले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी प्रत्येक वाहनाला फास्टॅगची सक्ती केलेली आहे. असे असले तरी ज्यांनी हे फास्टॅग लावले त्यांना अजूनही टोलनाक्यावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. फास्टॅग असूनही जर वाहतूक कोंडीत अडकावे लागत असेल तर त्यासाठी पैशांची गुंतवणूक का करायची? असा थेट सवालही आता वाहनचालकांकडून उपस्थित होत आहे.
मुंबई, ठाण्याच्या सीमेवरील मुलुंड टोलनाका येथे सकाळी आणि सायंकाळी ऐन कामावर जाण्याच्या आणि घरी परतण्याच्या वेळांमध्ये नोकरदार वर्गाला अजूनही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. फास्टॅग सुरू झाले असले तरी काही वेळा वाहन आणि स्कॅनर मशीन यांच्यातील अयोग्य अंतरामुळे ते स्कॅनिंग होत नाही. त्यामुळे या वाहनाचा टोलनाक्यावर खोळंबा होतो. अनेकदा तर संबंधितांच्या बँक खात्यात पैसे असूनही मोटारकार ब्लॅक लिस्टेड असल्याचे मशीनद्वारे सांगितले जाते. त्यामुळे कारमधील व्यक्ती ‘व्हीआयपी’ असूनही त्यांची चांगलीच पंचाईत होते. जर आपली चूक नसेल तर दुहेरी टोल का भरायचा? असा सवालही वाहनचालकांकडून केला जात आहे.
टोलनाक्यावर वाहनांची कोंडी होऊ नये, यासाठी सध्या केंद्र सरकारने फास्टॅग ही योजना आणली आहे. यापुढे ज्यांच्या वाहनाला फास्टॅग नसेल त्यांना टोलनाक्यावर दुपटीने टोल भरावा लागणार आहे. अर्थात, राष्ट्रीय महामार्गावर सध्या या फास्टॅगची कडक अंमलबजावणी केली जात असल्यामुळे मुंबईत प्रवेश करणाऱ्या मार्गांवर तरी रोखीने टोल भरण्यासाठीच्या स्वतंत्र मार्गिका आहे. फास्टॅगच्या रांगेमध्ये रोखीने टोलचा भरणा करणारे वाहन शिरले तर त्यांच्याकडून दुहेरी टोल दंड स्वरूपात वसूल केला जातो. सध्या तरी अशा प्रकारचा दंड मुंबईत प्रवेश करणाऱ्या या वाहनांकडून ऐरोली, मुलुंड या नाक्यावर वसूल केला जात नाही. मात्र, तो वांद्रे-वरळी या सीलिंकवर घेतला जातो. दिवसाला साधारण अशी २७० वाहने सीलिंकवर आढळतात, अशी माहिती एमईपीच्या सूत्रांनी दिली.
केंद्र सरकारने सक्ती केल्यामुळे दंडातून आणि वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी अनेक वाहनधारकांनी असे फास्टॅग बसवून घेतले आहे. ठाणे आणि मुंबईच्या सीमेवरील मुलुंड चेकनाका येथेही फास्टॅगसाठी स्वतंत्र मार्गिका आहेत. तरीही या ठिकाणी अनेकदा वाहनांच्या मोठ्या रांगा असतात. या मार्गिकेमध्ये इतर वाहन शिरले तरी वाहनचालक आणि टोलनाक्यावरील कर्मचारी यांच्यात चांगलेच खटके उडतात. अनेकदा टोलनाक्यावर रोखीच्या रांगेतही फास्टॅगचे वाहन शिरले तरी गोंधळ उडतो. अशा वेळी स्कॅनिंग गनच्या मदतीने टोल घेतला जातो. त्याच वेळी मागून आलेल्या वाहनांचाही खोळंबा होतो. अनेकदा वाहनधारकांच्या बँक खात्यात शिल्लक नसल्यामुळे ते वाहन ब्लॅक लिस्टेड होते. अशा वेळीही संबंधित वाहनाचा टोल स्कॅनिंग गनच्या मदतीने किंवा रोखीने घेतला जातो. यातही पुन्हा वेळ जात असल्यामुळे इतर वाहनांचा खोळंबा होतोच. एखादे वाहन जर फास्टॅगचे असेल त्यासाठी कोणताही अडथळा आला नाही तर साधारण १२ ते १५ सेकंदांमध्ये टोलनाक्यावरून ते जाऊ शकते. परंतु, यात पुन्हा वरीलप्रमाणे अडथळे आले तर मात्र इतर वाहनांनाही विलंब होतो, यातूनच पुन्हा वादाचे प्रसंग उद्भवतात.
फास्टॅग घेण्यासाठी साधारण ५०० रुपये लागतात. यात कराची रक्कम वगळता उर्वरित रक्कम फास्टॅगमध्ये टोल भरण्यासाठी शिल्लक राहते. पण, एखाद्याला आठवड्यातून एकदाच स्वत:च्या वाहनाने प्रवास करायचा असेल तरीही फास्टॅगची रक्कम गुंतवून राहते, असेही एका वाहनचालकाने सांगितले. अर्थात, एखाद्याला एकापेक्षा जास्त फेऱ्या करायच्या असतील तर २४ तासांमध्ये एकदाच तो टोल घेतला जात असल्याचा फायदा नियमित स्वत:च्या वाहनाने प्रवास करणाऱ्याला होत असल्याचेही एका चालकाने ‘लोकमत’ला सांगितले. त्यामुळे फास्टॅग म्हणजे ‘कही खुशी कही गम’ अशी परिस्थिती असल्याचेही आढळून आले आहे.
-------------------------------------
यंत्रणा आणखी सक्षम आणि सुरक्षित करायला हवी. अनेकदा बँक खात्यात रक्कम शिल्लक असूनही ते स्कॅन होत नाही. यात नाहक वेळ जातो.
- संभाजी चव्हाण, ठाणे
सध्या तरी फास्टॅगचा वापर करणे योग्य वाटते. यात रांग आणि वेळही वाचतो.
- प्रसाद जहागिरदार, कल्याण
.........................
२१ ठाणे टोलनाका