भरपावसातही गणेशभक्तांच्या गर्दीचा महापूर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2019 01:20 AM2019-09-02T01:20:34+5:302019-09-02T01:21:00+5:30
गणरायाचे आज आगमन : गणेशमूर्ती, सजावटीचे साहित्य, फुले खरेदीसाठी भक्तांची झुंबड, ढोलताशांच्या गजरात बाप्पांचे स्वागत
कल्याण : भक्तांची विघ्ने दूर करून सर्वत्र सुखसमृद्धी निर्माण करणाऱ्या गणपती बाप्पाच्या आगमनाचा आधीचा दिवस बाजारात नवचैतन्य निर्माण करून गेल्याचे चित्र कल्याण-डोंबिवलीत पाहायला मिळाले. पावसाची रिपरिप सुरू असतानाही रविवारी बाजारात गणेशोत्सवानिमित्तच्या खरेदीसाठी प्रचंड गर्दी झाली होती. गणेशमूर्ती, सजावटीची मखरे, रंगीबेरंगी मण्यांच्या माळा आणि गणरायाची आभूषणे खरेदीसाठी भाविकांची एकच झुंबड उडाली होती. त्यातच सकाळपासूनच पावसाने हजेरी लावल्याने गणेशमूर्ती नेण्यासाठी घराघरांतील भाविकांसह सार्वजनिक मंडळाची घाई सुरू होती. सायंकाळी पावसाचा जोर वाढल्याने भाविकांची गणपती नेताना चांगलीच कसरत झाली होती. पण, काही मंडळांकडून श्री गणरायाचे आगमन ढोलताशांच्या गजरात थाटामाटात झाल्याने वाहतूककोंडीच्या त्रासालाही वाहनचालक आणि पादचाऱ्यांना सामोरे जावे लागले.
कल्याण-डोंबिवलीत घरगुती ४५ हजार ५१ आणि सार्वजनिक मंडळाचे २८९ गणपती, तर दोन हजार ७४७ गौरींचे आगमन होणार आहे. सोमवारी गणपतीचे आगमन होत असून गौरींचे आगमन गुरुवारी होत आहे. सोमवारी गणपतीचे आगमन असले तरी, सार्वजनिक मंडळांनी सजावटीची पूर्वतयारी म्हणून आठवडाभर आधीपासूनच गणपती आणायला सुरुवात केली आहे. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी, रविवारी मात्र घरगुती गणपती आणणाºयांची संख्या अधिक पाहायला मिळाली. दरम्यान, रविवारी सकाळी सर्वच बाजारपेठा ग्राहकांनी फुलल्या होत्या. गणरायांच्या स्वागतासाठी बाजारदेखील सज्ज झाले होते. कल्याण पत्रीपुलालगत असलेला फुलांचा बाजारही असाच फुलला होता.
फुलांचे भाव भिडले गगनाला, झेंडूची फुले ८0 रुपये किलो
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात फुलबाजार भरतो. कल्याण परिसराला सिन्नर, जुन्नर, नाशिक, आळेफाटा, अहमदनगर या भागांमधून फुलांचा पुरवठा होतो. दररोज साधारणत: ५० प्रकारची फुले या बाजारात विक्रीसाठी आणली जातात. बंगळुरू, गुजरातमधूनही येथील बाजारात फुले विक्रीसाठी येतात.
महत्त्वाचे म्हणजे ठाणे व आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात फुलांची निर्यात होत असते. शहापूर, भिवंडी, कल्याण, मुरबाड व उल्हासनगर या पाच तालुक्यांमधील किरकोळ फुलविक्रेत्यांचा व्यवसाय या बाजारावरच अवलंबून असतो. दरम्यान, गणेशोत्सव असो अथवा नवरात्रोत्सव या काळात या बाजाराला विशेष महत्त्व असते.
गणपती येताच फुलांचे भाव गगनाला भिडतात. त्यानुसार यावेळीही वाढ झाली. झेंडूची फुले ६०-८० रुपये किलो, सफेद फुले २०० रुपये किलो, दूर्वा १० रुपये, बारीक गुलाबांची फुले १५० रुपये डझन, मोठ्या फुलांचा हार १०० रुपये, तर लहान हार ५० रुपये, झेंडूच्या फुलांचे तोरण ६० रुपये दराने विकले जात होते.
फळांची खरेदी करण्याची लगबगही भाविकांमध्ये दिसून आली. कल्याण बाजार समितीतील फुलमार्केटप्रमाणेच कल्याण पश्चिमेकडील शिवाजी चौक, मोहम्मदअली चौक, शंकरराव चौक याठिकाणीही पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
ठाण्यातील बाजारपेठा भक्तांनी फुलल्या
ठाणे : सोमवारपासून गणेशोत्सवास प्रारंभ होत असल्याने, त्यानिमित्ताने हळूहळू सुरू झालेल्या खरेदीचा वीकेण्डला जोर दिसून आला. अशातच पावसाने हजेरी लावली असली तरी, रविवारी अखेरच्या दिवशी ठाण्याच्या बाजारपेठांत गर्दीचा महापूर दिसून आला.
गणरायाच्या स्वागताची तयारी महिनाभरापासून घरोघरी सुरू झाली होती. घरातील साफसफाईपासून मूर्तींचे, मखरांचे बुकिंग केले जात होते. मूर्तींच्या कारखान्यांत मूर्तिकारांचेही युद्धपातळीवर काम सुरू होते. उद्या गणरायाचे आगमन होणार असून, त्यामुळे भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. उत्सवाच्या तयारीचा उत्साह शनिवार-रविवारी बाजारपेठांत दिसून आला. फुलांपासून अगदी मोदकांच्या खरेदीपर्यंत सर्वच प्रकारांची खरेदी भक्तांनी रविवारीच उरकून घेतली. उरलीसुरली खरेदी त्यांनी सोमवारी सकाळवर ढकलली. आठवडाभरापासूनच साहित्याची यादी घराघरांत तयार होऊ लागली होती. हळूहळू, वेळ मिळेल त्यानुसार एकेक वस्तू आणल्या जात होत्या. सोमवारीच गणेशोत्सवास सुरुवात होणार असल्याने खरेदीसाठी भक्तांनी वीकेण्डचा मुहूर्त साधला. जांभळी मार्केट ही ठाण्यातील मुख्य बाजारपेठ असल्याने स्टेशन रोडपासून अगदी जांभळीनाक्यापर्यंत गर्दीचा महापूर दिसून येत होता. पाय ठेवायलाही जागा नव्हती. रविवारी काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांत, सोसायटीच्या गणेशोत्सवात वाजतगाजत गणरायाचे आगमन झाले. महागाई वाढल्याने यंदा खिसा चाचपतच गणेशभक्तांकडून खरेदी केली जात असल्याचे पाहायला मिळाले. महिनाभरापासूनच बाजारपेठा सज्ज झाल्या होत्या. बाजारपेठांच्या रस्त्याच्या कडांना आदिवासी महिला फुले, भाज्या, केळीची पाने, कडुनिंबाच्या पानांच्या टोपल्या घेऊन बसल्या होत्या. महापालिका मुख्यालयासमोरदेखील काही महिला विक्रीसाठी बसल्याचे पाहायला मिळाले. बाजारपेठांत रस्ता असो वा फुटपाथ जागा मिळेल तिथे विक्रेते बसून विक्री करीत होते. या दिवसांत कमाई चांगलीच होत असल्याने अगदी भिवंडी ग्रामीण भागांपासून कर्जत, कसाºयाहूनदेखील महिला पहाटेपासूनच बाजारपेठांत भाजीविक्रीसाठी आल्या होत्या. कोणी डोक्यावर मखर घेऊन जात होते, कोणी पिशव्याच्या पिशव्या भरून भाज्या नेत होते, कोणी फुले घेऊन जात होते, तर कोणी मिठाईची खरेदी करीत होते. सजावटीचे साहित्य, लायटिंगलाही भक्तांकडून मागणी होती. मध्येच कोणी मोराची पिसे विकताना दिसत होते. मोदकाची आणि फुलांची खरेदी शेवटच्या यादीत ठेवल्याने याची खरेदी रविवारी झाली. सकाळपासूनच बाजारपेठांत गर्दी होती. दुपारच्या वेळेस किंचितशी गर्दी ओसरली. सायंकाळी गर्दीचा महापूर पुन्हा एकदा ओसंडून वाहत होता. गर्दीमुळे वाहतुकीचे तीनतेरा वाजले होते. बाजारपेठांतून एखादी गाडी काढणे म्हणजे तारेवरची कसरतच. अशा तोबा गर्दीतही भक्तांचा खरेदीचा उत्साह उतरला नव्हता. खरेदीसाठी महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक सर्वच जण आले होते. लहान मुलांसाठी कपड्यांची खरेदीही जोरात सुरू होती.
महात्मा फुले मार्केट येथे असलेल्या छोट्या गल्लींमध्ये पूजेचे साहित्य मिळते, तिला पूजागल्ली म्हणतात. याठिकाणी भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली.