महासभेतही महाशिवआघाडी, प्रस्तावांचा विरोध मावळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 12:47 AM2019-11-12T00:47:58+5:302019-11-12T00:48:02+5:30
एकीकडे राज्यात महाशिवआघाडीची सरकार स्थापनेकडे वाटचाल सुरू असताना दुसरीकडे ठाणे महापालिकेतही तिचे दर्शन झाले.
ठाणे : एकीकडे राज्यात महाशिवआघाडीची सरकार स्थापनेकडे वाटचाल सुरू असताना दुसरीकडे ठाणे महापालिकेतही तिचे दर्शन झाले. सोमवारी झालेल्या महासभेत कोणते विषय मंजूर करायचे, कोणते नामंजूर, तहकूब करायचे, असे सर्व सोपस्कार शिवसेना, राष्टÑवादी आणि काँग्रेसचे आधीच ठरल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे महासभेचा हा अजेंडा ठरवित असताना भाजपला कसे अडचणीत आणायचे, याची रणनीतीही निश्चित झाली होती. त्यानुसार, महासभेत भाजप विरुद्ध महाशिवआघाडी असे चित्र दिसून आले. एकेक विषय मंजूर करीत असताना महाशिवआघाडीचा विजय असो, असा जयघोषही काहीवेळ पाहावयास मिळाला.
राज्यात आता शिवसेना, राष्टÑवादी आणि काँग्रेस अशी सत्तेची समीकरणे जुळत आली असताना त्याचा फायदा घेऊन ठाणे महापालिकेत मात्र महाशिवआघाडीचे सूत जळून आल्याचे दिसून आले. महापालिकेत सध्या शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे भाजपसह राष्टÑवादी हे सुरुवातीपासून विरोधी बाकावर आहेत. मात्र, राज्यात युतीचे सरकार याआधी होते, त्यानुसार काही गोष्टींमध्ये भाजप ठाण्यात शिवसेनेला साथ देत होती. तर, राष्टÑवादीकडून विरोधी पक्षाची भूमिका बजावली जात होती. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना नको ते विषय मंजूर करायचे, जरी झाले तरी त्याला राष्टÑवादी विरोध करताना दिसत होती. काही प्रकरणांवरून तर राष्टÑवादी थेट न्यायालयातही गेली आहे.
परंतु, आता राज्यात महाशिवआघाडीची समीकरणे जुळून येत असताना त्याचा फायदा घेऊन शिवसेनेने राष्टÑवादी आणि काँग्रेसला आपलेसे करून सोमवारी झालेल्या महासभेत अनेक किचकट आणि नको ते विषयसुद्धा एकहाती मंजूर करून घेतले. विशेष म्हणजे महासभा कशी चालवायची, शिवसेनेच्या नगरसेवकांनी कशी भूमिका घ्यायची, त्याला राष्टÑवादी त्याला कशा प्रकारे उत्तर देणार आणि भाजपला एकाकी कसे पाडले जाईल, यासाठीची रणनीती आदल्यादिवशीच निश्चित केली होती.
त्यानुसार, महासभा सुरू होण्यापूर्वीही महाशिवआघाडी अधिक घट्ट करण्यात आली. त्यानुसार, महासभेत मंजुरीसाठी आलेल्या एक्सॉनला जागा देण्याच्या प्रस्तावाविरोधात भाजपचे सर्व नगरसेवक असताना शिवसेना, राष्टÑवादी आणि काँग्रेसने हा विषय चुटकीसरशी मंजूर करून घेतला.
>आता भाजप विरोधी बाकांवर
आता आपली महाशिवआघाडी आहे, असे सांगून महाशिवआघाडीचा विजय असो, अशी घोषणाही करण्यास काही नगरसेवक मागेपुढे पाहताना दिसले नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजपचे गटनेते नारायण पवार यांनी काही प्रकरणांना विरोध करण्याचा प्रयत्न करत असताना तू पण काँग्रेसमध्ये होता, आता तुला पश्चात्ताप होईल, असा टोमणाही काँग्रेसचे गटनेते विक्रांत चव्हाण यांनी पवार यांना लगावला. एकूणच भाजपचे २३ नगरसेवक एकीकडे आणि महाशिवआघाडीचे नगरसेवक एकीकडे असे संख्याबळ महासभेत दिसून आले. त्यामुळे भाजप या महासभेत विरोधी बाकावर गेल्याचे दिसून आले.