लाखोंचं घर घेऊनही पाच वर्षे प्यायला पाणी नाही;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:29 AM2021-05-28T04:29:15+5:302021-05-28T04:29:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अंबरनाथ : विकासकांनी लाखो रुपयांच्या सदनिकांची ग्राहकांना विक्री करताना विविध सुख-सोयी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबरनाथ : विकासकांनी लाखो रुपयांच्या सदनिकांची ग्राहकांना विक्री करताना विविध सुख-सोयी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र गेल्या पाच वर्षात धड प्यायला पाणीही उपलब्ध करून दिलेले नाही. त्यामुळे संतप्त सदनिकाधारकांनी एका बिल्डरच्या ऑफिसला बुधवारी टाळे ठोकत घोषणाबाजी केली. तसेच अंबरनाथमध्ये घर घेत असाल, तर फसवणूक करणाऱ्या विकासकांपासून सावधान... असा प्रचारही त्रस्त सदनिकाधारकांनी सुरू केला आहे.
येथील सदनिकाधारकांना अनेक नागरी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पिण्यासाठी पाणीच नसून दरवर्षी मात्र पावसाळ्यात अनेकदा पाणी साचून नागरिकांचे अतोनात नुकसान होत आहे. मागील चार वर्षांपासून पाण्याच्या टाकीचे काम सुरू असून अद्याप पाणी नागरिकांना उपलब्ध झालेले नाही, सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असला तरी, गढूळ आणि पिवळे पाणी नागरिकांना पुरवण्यात येत आहे.
अंबरनाथ शहरातील शिवमंदिरच्या मागील बाजूस काही वर्षात अनेक टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत. याठिकाणी चार ते पाच हजार नागरिकांची लोकवस्तीही आहे. बहुतांश नागरिकांनी कर्ज काढून याठिकाणी घरे खरेदी केली आहेत. परंतु त्या घरात राहण्यासाठी आल्यावर आपली फसवणूक झाल्याचे रहिवाशांच्या लक्षात आले आहे. मागील पाच वर्षांपासून नागरिकांना पिण्यासाठी पाणीच नाही. नागरिकांना पाणी लगेच देऊ. असे आश्वासन विकासकाने दिल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र गेल्या पाच वर्षांपासून बोअरिंगचे फिल्टर केलेले पाणी आणि टँकरचे पाणी बिल्डर नागरिकांना पाजत आहेत.
एवढेच नव्हे, तर टोलेजंग इमारतीचे बांधकाम करताना बिल्डरांनी आपल्या फायद्यासाठी मोठमोठे नाले अरुंद केल्याने दरवर्षी अनेक इमारतीत पाणी साचून तलावजन्य परिस्थिती निर्माण होते. याला जबाबदार कोण, बिल्डर की नगरपालिका, असा प्रश्न मनसेने उपस्थित केला. मनसेचे शहर उपाध्यक्ष अजय पाटील यांनी याविरुद्ध आवाज उठवला असून, बिल्डरविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात केली आहे.
--------