दुसरी लाट ओसरली तरी कंत्राटी सेवेतील कर्मचारी होणार नाही कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:49 AM2021-06-09T04:49:28+5:302021-06-09T04:49:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोनाची दुसरी लाट आता हळूहळू ओसरू लागली आहे. त्यामुळे शहरातील खासगी व मनपाच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोनाची दुसरी लाट आता हळूहळू ओसरू लागली आहे. त्यामुळे शहरातील खासगी व मनपाच्या कोविड सेंटरमधील रुग्णसंख्या घटू लागली आहे. त्यामुळे आता येथील कंत्राटी डॉक्टर, नर्स, आया, वॉर्डबाय, सफाई कामगार आदी कर्मचाऱ्यांना पुन्हा घरी पाठविले जाणार असल्याची चर्चा सुरू होती; परंतु मनपाने यातील एकही कर्मचारी कमी केले जाणार नाहीत. तसेच कोविड सेंटर बंद केले जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. कोरोनाची तिसरी लाट कधी येईल, याचा नेम नसल्याने त्यांची सेवा तूर्तास अबाधित ठेवण्यात येत असल्याचे मनपाने सांगितले. त्यामुळे १२०० कंत्राटी कामगारांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.
शहरात कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर मनपाने कोविड सेंटर, विलगीकरण केंद्रे बंद केली होती. तसेच येथील कर्मचारीही कमी केले होते. त्यानंतर आलेल्या दुसऱ्या लाटेत मनपाने पुन्हा कोविड सेंटर पूर्ण क्षमतेने सुरू केली. मनपातर्फे सध्या ३४ खासगी कोविड सेंटर, मनपाचे ग्लोबल कोविड सेंटर, पार्किंग प्लाझा कोविड सेंटर, मुंब्रा कोविड सेंटर सुरू आहे. यातील कळवा येथील कोविड सेंटर पावसाला सुरुवात होत असल्याने बंद केले आहे; परंतु येथील कर्मचाऱ्यांना ग्लोबल रुग्णालयात आणण्यात आले आहे.
-----------
ठाण्यातील एकूण कोविड केअर सेंटर - ४
या सेंटरसाठी घेतलेला कंत्राटी कर्मचारी - १२००
सध्या सुरू सेंटर - ३
बंद झालेले सेंटर - १
एकूण रुग्ण - १,२९,७९१
बरे झालेले रुग्ण - १,२६,४५७
कोविड केअर सेंटरमधील उपचाराधीन रुग्ण - ५७२
---------
एक कोविड केअर सेंटर बंद
ठाणे महापालिकेने एमएमआरडीएच्या माध्यमातून कळवा आणि मुंब्रा येथे दोन कोविड सेंटर सुरू केली आहेत. तेथे मनपातर्फे ही दोन केंद्रे चालविली जात आहेत; परंतु यातील तीन केंद्रे सुरू असून कळव्यातील केंद्र बंद केले आहे. तेथे मोकळ्या मैदानात हे सेंटर उभारण्यात आले होते; परंतु पावसामुळे ते केंद्र बंद केले आहे.
ठाण्यात कोरोना रुग्णांची संख्या घटली असली तरी मनपातर्फे आता टप्प्याटप्प्याने खासगी कोविड सेंटर म्हणजेच रुग्णालये कमी केली जाणार आहेत; परंतु कोविड सेंटर बंद केली जाणार नाहीत. कारण कोरोनाची तिसरी लाट केव्हा येईल, हे काही सांगता येत नाही. त्यामुळे त्याचे आधीच नियोजन करण्यासाठी स्टाफ कमी केला जाणार नसून, कोविड सेंटरही सुरूच ठेवली जाणार आहेत.
--------
कोरोनाची दुसरी लाट १७ फेब्रुवारीला सुरू झाली, तेव्हा शहराचा पॉझिटिव्हिटी दर दोन टक्क्यांच्या वर होता. आताही तशीच परिस्थिती आहे. त्यामुळे कोविड सेंटर किंवा तेथील स्टाफ कमी केला जाणार आहे. कारण कोरोनाची तिसरी लाट केव्हा येईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे त्याची खरबरदारी घेण्यासाठी सध्या कोणालाही कमी केले जाणार नाही.
- डॉ. विपीन शर्मा, आयुक्त, ठामपा
--------------