शिमगा गेला, गुढी उतरली तरी महायुतीचा उमेदवार ठरेना
By अजित मांडके | Published: April 12, 2024 08:24 AM2024-04-12T08:24:27+5:302024-04-12T08:30:33+5:30
उमेदवार शिंदेसेना की भाजपच्या चिन्हावर लढणार याचा वाद
अजित मांडके
ठाणे : शिमगा गेला, गुढीदेखील उभारली गेली, तरीसुद्धा अद्याप ठाणे लोकसभेचा महायुतीचा उमेदवार घोषित झालेला नाही. उमेदवार निश्चित नसताना प्रचार मात्र सुरू आहे. उमेदवार निश्चित होत नसल्याने कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत. लवकर उमेदवार जाहीर करा, अशी मागणी कार्यकर्ते करीत आहेत. ठाणे शिंदेसेनेचा गड. तरी भाजपने यावर दावा ठोकला आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना आणि भाजपला मोठा इतिहास आहे. मागील काही वर्षे या मतदारसंघावर शिवसेनेने राज्य केले. तत्पूर्वी या मतदारसंघावर भाजपचा वरचष्मा होता. परंतु, सध्याची राजकीय परिस्थिती बदलल्याने भाजपने या मतदारसंघावर आपला दावा अधिक प्रबळ केला आहे. परंतु, शिंदेसेना हा मतदारसंघ सोडण्याच्या मन:स्थितीत नाही. महायुतीकडून मोदीच आपले उमेदवार असल्याचे सांगत मेळावे घेतले जात आहेत. परंतु, जोपर्यंत उमेदवार जाहीर होत नाही, तोपर्यंत प्रचाराला सुरुवात झालेली नाही. विद्यमान खासदारांकडून हे संकेत पाळले गेले आहेत. असे असतानाही प्रचाराचा नारळ महायुतीकडून वाढविण्यात आला.
महायुतीचे मेळावे घेतले जात असून, या मेळाव्यात शिंदेसेना आणि भाजपकडून इच्छुक असलेले सर्वच उमेदवार एकाच व्यासपीठावर हजर राहत आहेत. परंतु, आपण प्रचार नेमका कोणाचा करायचा, आपल्या विभागात कोणासाठी मते मागायची याबाबत कार्यकर्ता संभ्रमावस्थेत आहे. धुळवडीच्या दिवशी उमेदवार जाहीर होईल, असे सुरुवातीला सांगितले होते. उमेदवाराची घोषणा गुढीपाडव्याच्या दिवशी केली जाईल, असे सांगितले होते. परंतु, होळी आणि गुढी सरली, तरीसुद्धा महायुतीचा उमेदवार काही जाहीर होत नाही.
सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, उद्धवसेनेकडून जो उमेदवार रिंगणात आहे, त्याला महायुतीकडून कमी लेखले जात नाही. महायुतीकडून सावध पावले टाकली जात आहेत. आताच उमेदवार जाहीर केला किंवा ही जागा भाजपला सोडली तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात, याचा अभ्यास शिंदेसेना आणि भाजप करीत आहे. शिंदेसेनेकडून आताच उमेदवार जाहीर केला गेला तर विरोधकांकडून निष्ठावंत विरुद्ध गद्दार असा प्रचार केला जाऊ शकतो. ते शिंदेसेनेला न परडवणारे आहे. त्यामुळे ऐनवेळी उमेदवार जाहीर करण्याचा विचार महायुती करीत आहे.