प्रेयसीला जखमी करणारा आरोपी भाजपचा पदाधिकारी असता तरी त्याची गय केली नसती!- चित्रा वाघ
By जितेंद्र कालेकर | Updated: December 19, 2023 21:31 IST2023-12-19T21:31:30+5:302023-12-19T21:31:45+5:30
एसआयटी पीडितेचा पुन्हा जबाब नोंदविणार

प्रेयसीला जखमी करणारा आरोपी भाजपचा पदाधिकारी असता तरी त्याची गय केली नसती!- चित्रा वाघ
जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: प्रेयसीला मारहाण करून नंतर तिला कारची धडक देणारा अश्वजित गायकवाड हा पूर्वी भाजपा युवा मोर्चाचा पदाधिकारी होता. आता त्याचा भाजपशी कोणताही संबंध नाही. जरी तो भाजपचा पदाधिकारी असता, तरी पक्षाने त्याची गय केली नसती, असे भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी सांगितले.
या प्रकरणातील पीडितेची सोमवारी रात्री त्यांनी रुग्णालयात भेट घेतली. त्यानंतर त्या माध्यमांशी बाेलत होत्या.
कोणालाही पाठीशी घालण्याची सरकारची भूमिका नसल्याचे यावेळी वाघ यांनी स्पष्ट केले. तिची प्रकृती सुधारत आहे. या मारहाण आणि कार पायावरून नेण्याच्या घटनेची गंभीर दखल मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी घेतली आहे. सखोल तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन केली आहे. तिच्यासह तिच्या कुटुंबीयांशी, तसेच कासारवडवली पोलिसांशी आपले बोलणे झाले आहे. तपास करणारी एसआयटी तिचा पुन्हा जबाब नोंदविण्याची कार्यवाही करीत आहेत. त्यानुसार पुन्हा कासारवडवली पोलिस गुन्ह्यात कलमे वाढवून पारदर्शक कारवाई करतील, असे आश्वासन त्यांनी दिले.
अश्वजित हा पालघर युवा मोर्चाचा चार वर्षांपूर्वी पदाधिकारी होता. आता त्याचा भाजपशी कोणताही संबंध नसल्याचा खुलासा वाघ यांनी केला आहे. तो जरी भाजपचा पदाधिकारी असता तरीही गंभीर गुन्ह्यात कोणालाही पाठीशी घालण्यात येणार नसून, नि:पक्षपणे या प्रकरणाची चौकशी केली जाणार असल्याचेही वाघ यांनी स्पष्ट केले.