नालेसफाईची मुदत संपत आली तरी नाल्याचा कचरा गाळालाच, अनेक ठिकाणी नाले सफाईच झाली नाही

By अजित मांडके | Published: May 30, 2024 12:57 PM2024-05-30T12:57:37+5:302024-05-30T13:11:01+5:30

ठेकेदारांच्या मनमर्जीनुसार निविदा काडून सुद्धा नालेसफाईच्या कामात हलगर्जीपणा

Even if the term of drain cleaning is over, the waste of the drain is still deposited, in many places the drains have not been cleaned at all | नालेसफाईची मुदत संपत आली तरी नाल्याचा कचरा गाळालाच, अनेक ठिकाणी नाले सफाईच झाली नाही

नालेसफाईची मुदत संपत आली तरी नाल्याचा कचरा गाळालाच, अनेक ठिकाणी नाले सफाईच झाली नाही


ठाणे  :  ठाणे महानगरपालिका हद्दीतील नाले सफाईच्या कामांना सुरुवात झाली असल्याचे दाखविले जात असले तरी ३१ मेच्या आधी नाले सफाई पूर्ण होणार नसल्याचे दिसून येत आहे. ठाण्यातील गांधीनगर, कापूरबावडी, नलपाडा, लोकउपवन, घोडबंदर रोड, लोकमान्य नगर,वागळे इस्टेट येथील अनेक नाल्यांमध्ये कचऱ्यांचा ढीग साचलेलाच दिसून येत असून ठेकेदाराने नालेसफाई त्वरीत न केल्यास मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा  मनसेचे स्वप्नील महिंद्रकर यांनी दिला आहे.

महापालिका हद्दीत सुमारे ३०८ किमी अंतराचे १२९ छोटे व मोठे नाले आहेत. ठाण्यातील नालेसफाई व्यवस्थितरित्या व्हावी, यासाठी तत्कालीन आयुक्त अभिजीत बांगर यांनी निविदा प्रक्रियेमध्ये नाल्यांच्या सफाई संदर्भात काही अटी व शर्ती लागू केल्या होत्या. पण ठेकेदारांनी संगनमत करून या अटी व शर्ती हटवण्यास महापालिका प्रशासनाला भाग पाडले. असे करून सुद्धा ठाण्यातील नाल्यांची सफाईची परिस्थिती बघितल्यास बहुतेक नाल्यांमध्ये कचरा तसाच असून ठेकेदार फक्त हाथ सफाई करत असल्याचा  स्वप्निल महिंद्रकर यांनी आरोप केला आहे.

दर वर्षी पावसाळ्यापूर्वी या नाल्यांची सफाई करण्यात येते तसेच वर्षभर है नाले साफ ठेवण्याचे काम घनकचरा विभागाच्या माध्यमातून करण्यात येते. मात्र, पावसाळ्यापूर्वी घन कचरा विभागामार्फत नाल्यांची काटेकोर सफाई केली जात नसल्यामुळे  पावसाळ्यात पाणी साठून ते घरांमध्ये शिरते. याचा नाहक त्रास ठाणेकरांना सहन करावा लागत असून नाले सफाई करताना त्यात जलवाहिन्या, वीज वाहिन्या येतात. त्यामुळे या सर्व विभागांनी समन्वय साधून काम करणे आवश्यक असूनही ते होत नसल्याचे वास्तव आहे. ठाण्यातील नाले साफसफाई म्हणजे केवळ हात सफाई असल्याचे वारंवार निदर्शनास येऊन देखील दरवर्षी कुठलीही कारवाई ठेकेदारांवर केली जात नसल्यामुळे ठेकेदार सुद्धा बिंदिक्तपणे सफाई कामात हलगर्जीपणा करत असल्याचे दिसून येत आहे.

ठाण्यातील कचऱ्याच्या समस्येमुळे रोगराईचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. नालेसफाईचे काम व्यवस्थितरित्या होण्याच्या अनुषंगाने प्रभाग समितीनिहाय नालेसफाईचे काम करण्यात येऊन सुद्धा ठाण्यातील नाल्यांची परिस्थिती आजतागायत सुधारलेली नाही. दरवर्षी करोडो रुपये नालेसफाईच्या नावावर मंजूर केले जातात. मात्र अधिकारी आणि ठेकेदार संगनमत करून काम न करताच पैशांची बिलं काढण्यात आपली धन्यता मानता.
( स्वप्नील महिंद्रकर, ठाणे शहराध्यक्ष जनहित व विधी विभाग मनसे)

आम्ही या विभागात गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून राहत असून येथे नालेसफाई न झाल्यामुळे लोकांच्या घरी पाणी घुसते व त्यामुळे येथे डेंगू मलेरिया सारखे आजार पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर होतात व त्याचा नाहक त्रास आम्हाला भोगाव लागतो. 
मनीष सावंत, स्थानिक नागरिक. गांधीनगर

Web Title: Even if the term of drain cleaning is over, the waste of the drain is still deposited, in many places the drains have not been cleaned at all

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.