वेळ वाढविली तरी ३० टक्केच बार, हॉटेल सुरू; कामगारांची समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 11:35 PM2020-10-10T23:35:18+5:302020-10-10T23:35:42+5:30
ठाण्यात ११.३० पर्यंत मुभा, शहरातील हॉटेल, बार, फूडकोर्ट, रेस्टॉरंट हे ५ ऑक्टोबरपासून सुरू झाले होते.
ठाणे : मिशन बीगिनअंतर्गत शहरातील हॉटेल, बार, फूडकोर्ट शनिवारपासून रात्री ११.३० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा ठाणे महापालिकेने दिली आहे. मात्र, शहरातील ३० टक्केच हॉटेल सुरू झाले आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे गावाला गेलेले कामगार अद्याप परतलेले नाहीत. त्यामुळे मनुष्यबळाची समस्या भेडसावत आहे. तसेच ४० टक्के हॉटेल व्यावसायिकांची पुन्हा व्यवसाय सुरू करण्याची मानसिकताच नसून त्यांनी हॉटेलच विकण्यास काढल्याची माहिती मिळत आहे.
शहरातील हॉटेल, बार, फूडकोर्ट, रेस्टॉरंट हे ५ आॅक्टोबरपासून सुरू झाले होते. ठाण्यातील केवळ १० टक्केच बार या दिवशी सुरू झाले होते. या हॉटेल आणि बारवाल्यांचा खरा व्यवसाय हा सायंकाळी ७ नंतर सुरू होतो. त्यामुळे बार असोसिएशनने याबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर, शिष्टमंडळाने पालिका आयुक्तांची भेट घेतल्यानंतर आता १० आॅक्टोबरपासून पालिकेने आदेश जारी करून वेळ वाढवली आहे. यानंतरही शहरातील ३० टक्केच हॉटेल, बार सुरू झाल्याची माहिती बार असोसिएशनने दिली. कामगार नसल्याने १०० टक्के हॉटेल सुरू करता येणे शक्य नाही. कामगारांना संपर्क केला असता परिस्थिती पूर्णपणे निवळेपर्यंत येण्यास नकार देत आहेत. सात महिन्यांपासून व्यवसाय बंद असल्याने अनेकांची आर्थिककोंडी झाल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
वेळ वाढवण्यात आली; मात्र कामगारांची समस्या आमच्यासमोर आहे. तसेच नव्याने हॉटेल सुरू करताना त्याचा आर्थिक भार उचलण्याची ताकद आता अनेकांमध्ये नाही. त्यामुळे आजही शहरातील ३० टक्केच हॉटेल, बार सुरू झालेले आहेत. - रत्नाकर शेट्टी, सदस्य, ठाणे हॉटेल्स ओनर्स असोसिएशन