बॅलेट किंवा मशीनवर मतदान झाले तरी भाजप हरणारच!, नाना पटोलेंचं केंद्र सरकारवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 06:30 AM2023-04-11T06:30:06+5:302023-04-11T06:31:39+5:30

सत्तेचे जॅकेट घालणाऱ्यांना ते घालू द्या, त्या जॅकेटचा परिणाम आगामी कर्नाटक आणि महाराष्ट्रातील निवडणुकांवर होणार नाही.

Even if voting is done by ballot or machine BJP will lose says Nana Patole | बॅलेट किंवा मशीनवर मतदान झाले तरी भाजप हरणारच!, नाना पटोलेंचं केंद्र सरकारवर टीकास्त्र

बॅलेट किंवा मशीनवर मतदान झाले तरी भाजप हरणारच!, नाना पटोलेंचं केंद्र सरकारवर टीकास्त्र

googlenewsNext

ठाणे :

सत्तेचे जॅकेट घालणाऱ्यांना ते घालू द्या, त्या जॅकेटचा परिणाम आगामी कर्नाटक आणि महाराष्ट्रातील निवडणुकांवर होणार नाही. त्यात निवडणुकीचे मतदान हे बॅलेटने किंवा ईव्हीएम मशीनवर जरी झाले तरी भारतीय जनता पक्ष हरणार आहे, असे मत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मांडले. ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे सोमवारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत नाना पटोले बोलत होते. 

विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, एआयसीसीचे सचिव सहप्रभारी आशिष दुआ, संपतकुमार, खा. कुमार केतकर, माजी मंत्री विश्वजित कदम, माजी खा. हुसेन दलवाई, 

डाॅ. भालचंद्र मुणगेकर, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आ. वजाहत मिर्झा, सेवादलाचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, वरिष्ठ नेते उल्हास पवार, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सरचिटणीस प्रमोद मोरे, देवानंद पवार, ठाणे शहर प्रभारी शरद आहेर, ठाणे शहर जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण, दयानंद चोरगे यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित होते. 

 राहुल गांधी यांनी अदानी महाघोटाळ्यावर संसदेत मोदी सरकारला धारेवर धरले. मोदी-अदानी यांचा संबंध काय, हे प्रश्न विचारल्यानेच त्यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी या कारवाईंचा निषेध करत असून, राहुल यांच्या पाठीशी सर्वजण खंबीरपणे उभे आहेत.
 राहुल गांधींवरील कारवाईविरोधात जय भारत सत्याग्रहाची धार कायम ठेवत तालुका, गावपातळीवर हा सत्याग्रह पोहोचला पाहिजे. 
 शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत मिळाली पाहिजे. 
 जातनिहाय जनगणना करावी. काँग्रेस सरकार आले तर ओबीसींसाठी मंत्रालय करून भरीव आर्थिक तरतूद केली जाईल.
 राज्यात सामाजिक विद्वेष पसरवण्याचे षङ्यंत्र रचले आहे, जनतेने याला बळी पडू नये.
  मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या आठवणी जागृत करण्यासाठी मविआ सरकारने कमिटी स्थापन केली होती; पण शिंदे सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे.
 स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान करणे व त्यांचे स्मरण करणे, त्यांचा गौरव केला जावा, असा कार्यक्रम वर्षभर राबविला जाणार आहे. 
 राज्यात ३२ लाख मुले स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करत असताना शिंदे सरकार मात्र आऊटसोर्सिंग करत आहे. काँग्रेस सरकार आल्यानंतर या भरती केल्या जातील.

भविष्यात ठाणे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे आमदार आणि खासदार दिसतील. ठाणे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांना धमकीचे फोन आले. तर, कार्यकर्ते गिरीश कोळी यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. त्याची साधी पोलिसांनी तक्रारही घेतली नाही, अशी खंत नाना पटोले यांनी व्यक्त केली. 

बाळासाहेब थोरात म्हणाले की, राज्यातील यापुढचा कालखंड निवडणुकीचा असून त्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. राहुल गांधी यांच्यावर झालेला अन्याय लोकांपर्यंत जाऊन सांगा. काँग्रेसला चांगले दिवस आहेत पुन्हा पक्षाला सोनियाचे दिवस येतील. अशोक चव्हाण म्हणाले की, देशातील आजची परिस्थिती पाहता भाजप सरकारने लोकशाहीचा खून केला असे म्हटले तर ते योग्यच आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, चोरांनाच टार्गेट केले जाते आणि अदानीला हिंडनबर्गने टार्गेट केले. 

Web Title: Even if voting is done by ballot or machine BJP will lose says Nana Patole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.