धो-धो पावसातही टँकर भागवतोय ‘त्या’ रहिवाशांची ‘तहान’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:44 AM2021-09-06T04:44:37+5:302021-09-06T04:44:37+5:30
कल्याण : पावसाच्या सरींवर सरी येत असतानाही दुसरीकडे कल्याणनजीकच्या आंबिवली परिसरातील नेपच्यून स्वराज्य सेक्टर २ मधील सोसायट्यांना पिण्याच्या पाण्याचे ...
कल्याण : पावसाच्या सरींवर सरी येत असतानाही दुसरीकडे कल्याणनजीकच्या आंबिवली परिसरातील नेपच्यून स्वराज्य सेक्टर २ मधील सोसायट्यांना पिण्याच्या पाण्याचे कमालीचे दुर्भीक्ष्य जाणवत आहे. केडीएमसीच्या पाणीपुरवठा विभागाकडून पाणीपुरवठा केला जात असला तरी सोसायटीत ते पुरेशा प्रमाणात येत नाही. पाणी वाढवून द्या, अशी मागणी रहिवाशांकडून वारंवार करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधींनाही पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने पावसातही रहिवाशांना टँकरच्या पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे.
आंबिवली पश्चिम भागात नेपच्यून स्वराज्य गृहप्रकल्प आहे. यातील सेक्टर दोन मधील रहिवास असलेल्या १० इमारतींमध्ये पिण्याच्या पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. याठिकाणी एकूण ४५० फ्लॅट आहेत. सव्वादोनशे फ्लॅटमध्ये कुटुंबे वास्तव्य करीत आहेत. संपूर्ण सेक्टर दोनला प्रतिदिन दीड ते दोन लाख लीटर पाण्याची गरज आहे. पण मनपाकडून ४० ते ५० हजार लीटरच पाणी उपलब्ध होत आहे. अपुऱ्या पाण्यामुळे आठ ते नऊ महिने दहा इमारतींमधील रहिवाशांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अपुऱ्या पाण्यामुळे एक दिवसाआड पाण्याचा वापर करावा लागत आहे. नेपच्यून गृहप्रकल्प हा पाणी वितरण करताना शेवटचा भाग पडत असल्याने याठिकाणी सर्वात उशिरा, कमी दाबाने पाण्याचे वितरण होते. त्याचा फटका येथील सेक्टर २ ला बसत आहे. पाणी वाढवून द्या, अशी मागणी मनपासह लोकप्रतिनिधींकडे केली आहे.
एका टँकरमागे २२०० रुपयांचा खर्च
कोणतीही सुधारणा पाणीपुरवठ्यात झालेली नाही अशी माहिती रहिवासी सुनील बोऱ्हाडे आणि सोसायटीचे पदाधिकारी भानुदास धोपटे यांनी दिली. पाणी पुरेसे येत नसल्याने एक दिवसाआड टँकर मागवावाच लागतो. यंदाच्या आठवड्यात पाच ते सहा वेळा टँकर मागविण्यात आला आहे. २२०० रुपये एका टँकरमागे खर्च करावा लागत असल्याचे बोऱ्हाडे म्हणाले. तातडीने रहिवाशांच्या पाणी समस्येची दखल घेऊन त्यावर ठोस उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.