युती झाली तरीही दुरावाच
By admin | Published: November 12, 2015 01:46 AM2015-11-12T01:46:55+5:302015-11-12T01:46:55+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेना-भाजपची युती झाली असली तरीही त्यांच्यातली दरी मात्र अजूनही कायम असल्याचे बुधवारी दोन्ही शहरांमध्ये शिवसेना आणि भाजपाने ठिकठिकाणी आपापले
अनिकेत घमंडी, डोंबिवली
कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेना-भाजपची युती झाली असली तरीही त्यांच्यातली दरी मात्र अजूनही कायम असल्याचे बुधवारी दोन्ही शहरांमध्ये शिवसेना आणि भाजपाने ठिकठिकाणी आपापले स्वतंत्र झेंडे लावून केलेल्या ‘भगवे’करणातून दिसून आले. त्यातही विशेष म्हणजे शिवसेनेच्या एकाही होर्डिंग्ज-बॅनरवर भाजपच्या नेत्यांचा नामोल्लेख नव्हता की, युतीचा संदर्भ. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सहकुटुंब हजर असतानाही घडलेल्या या दुफळीच्या प्रदर्शनामुळे केवळ पक्षश्रेष्ठींच्या आग्रही भूमिकेखातर महापालिकेत झालेली ही युती स्थानिक नेत्यांवर लादण्यात आली आहे का, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
कल्याणमध्ये जेथे बघावे तेथे भगवे झेंडे लावण्यात आले होते. त्यातच ठिकठिकाणी होर्डिंग्ज-बॅनर होते. त्या सर्वांतून केवळ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे आदी प्रमुख नेत्यांसह खासदार श्रीकांत शिंदे आदींचे फोटो होते. मात्र, त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, या शहरांमधील भाजपचे स्थानिक नेते आदींचा अभाव होता.
या भगवेकरणातून शिवसेनेला महापालिकेवर आपलेच वर्चस्व असल्याचे ठासून सांगायचे होते.
त्या दृष्टीनेच कल्याण रेल्वे स्थानकापासून दुर्गाडीपर्यंत आणि टिळक चौक-गांधी चौक आदींपासून महापालिकेपर्यंत सर्वत्र भगवेकरण करण्यात आले होते.
मित्रपक्ष भाजपला पूर्णपणे बाजूला ठेवून शिवसैनिकांनी जल्लोषाची तयारी केली होती. भाजपला मागील वेळेच्या तुलनेत एवढ्या जागा मिळूनही अखेरीस त्यांना उपमहापौरपदावरच सध्या तरी समाधान मानावे लागल्याचीही चर्चा महापालिका इमारतीबाहेर जमलेल्यांमध्ये रंगली होती.
अशीच काहीशी स्थिती डोंबिवलीतही दिसून आली. ज्या ठिकाणी भाजपचे उमेदवार जिंकले आहेत, त्या प्रभागांंमध्ये नागरिकांच्या लक्षात येतील अशा ठिकाणी झेेंडे लावले होते.
विशेषत: इंदिरा गांधी चौक, सावरकर
रोड, टिळक पथ, टिळकनगर, गोग्रासवाडी, मानपाडा रोड तसेच एमआयडीसीचा हमरस्ता आदी ठिकाणी भाजपा झेंड्यांचे भगवेकरण दिसून आले.
दुर्गाडी किल्ल्याचा परिसरही भगवा झाला होता. डोंबिवलीच्या गणेश मंदिर परिसरातही तेच चित्र होते. या दोन्ही ठिकाणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भेट दिली.
काही काळ नागरिकांशी चर्चा केली आणि महापौरपद शिवसेनेलाच मिळाल्याबद्दल नागरिकांचे जाहीर आभार मानले.
महापौरपदाची निवडणूक झाल्यानंतर महापालिकेसह कल्याणमध्ये शिवसैनिकांनी ठिकठिकाणी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंसह धर्मवीर आनंद दिघे यांच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
महापालिका मुख्यालयातून बाहेर पडतानाही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या एकाही पदाधिकाऱ्याची भेट घेतली नाही, याचीही सर्वत्र जोरदार चर्चा सुरू होती.