सदोष दरवाजांमुळे ‘बारवी’ भरलेले नसतानाही विसर्ग सुरू, केवळ ७१ टक्के पाणीसाठा
By पंकज पाटील | Published: July 30, 2024 08:23 AM2024-07-30T08:23:57+5:302024-07-30T08:27:28+5:30
यंदा धरण भरायला उशीर लागणार
पंकज पाटील, लाेकमत न्यूज नेटवर्क, अंबरनाथ : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बारवी धरणात आता ७१ टक्के पाणीसाठा तयार झाला आहे. मात्र, धरण पूर्ण भरलेले नसतानाही त्याच्या दरवाजांतून पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे नदी किनाऱ्यावरील गावांमध्ये धरण ओव्हरफ्लो झाले की काय, अशी चर्चा सुरू झाली होती. पण, आता धरणाच्या दरवाजांमध्ये दोष निर्माण झाल्यानेच पाण्याचा हा विसर्ग आपोआप सुरू असल्याचे उघड झाले आहे. या नादुरुस्त दरवाजांमुळे यंदा धरण भरण्यास उशीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
संपूर्ण ठाणे जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या बारवी धरणाच्या ११ दरवाजांपैकी चार दरवाजांमध्ये काही दोष निर्माण झाला आहे. या धरणाचे दरवाजे स्वयंचलित आहेत.
दोष तातडीने दुरुस्त करण्याची मागणी
धरण भरल्यावर दरवाजावर पाण्याचा दाब निर्माण होऊन ते आपोआप उघडतात. कोणतेही यांत्रिक उपकरण वापरावे लागत नाही. पाणीसाठा वाढत असताना काही दरवाजांमध्ये किंचितसा दोष निर्माण झाल्याने चार दरवाजांमधून पाणी बाहेर पडू लागले आहे. त्यातील एका दरवाजातून जास्त प्रमाणात पाणी बाहेर पडत असल्यामुळे धरण भरण्यास विलंब लागणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. गेल्यावर्षी २९ जुलै रोजी धरण ९० टक्के भरले होते. मात्र, यंदा दमदार पाऊस होऊनही धरणात अजूनही ७१ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे धरणाच्या दरवाजांमध्ये निर्माण झालेला दोष तातडीने दुरुस्त करण्याची गरज आहे.