ठामपा तिजोरीत पैसा नसतानाही साडेपाच कोटींची उधळपट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:46 AM2021-08-18T04:46:56+5:302021-08-18T04:46:56+5:30
ठाणे : ठाणे महापालिकेच्या तिजोरीत कोरोनामुळे पालिकेची आर्थिक स्थिती खालावली आहे. त्यामुळे नगरसेवकांच्या प्रभाग सुधारणा निधीसह नगरसेवक निधीची कामेदेखील ...
ठाणे : ठाणे महापालिकेच्या तिजोरीत कोरोनामुळे पालिकेची आर्थिक स्थिती खालावली आहे. त्यामुळे नगरसेवकांच्या प्रभाग सुधारणा निधीसह नगरसेवक निधीची कामेदेखील अद्यापही मार्गी लागलेली नाहीत. असे असताना प्रशासनाने सत्ताधारी शिवसेनेच्या मर्जीतील नगरसेवकांसाठी ग्रीन कार्पेट अंथरल्याची बाब समोर आली आहे. महापालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद केली नसतानाही रघुनाथनगरच्या संकल्प चौकातील संगीत भूषण पंडित राम मराठे रंगमंचाचे आरसीसी बांधकाम व सभोवतालच्या परिसराच्या सुशोभीकरणाचा प्रस्ताव जून महिन्यात झालेल्या महासभेत आयत्या वेळेचा विषय म्हणून मंजूर केला. यावर तब्बल ५ कोटी ४९ लाखांचा निधी खर्च केला जाणार आहे.
कोरोनामुळे पालिकेच्या तिजोरीवर मागील पावणेदोन वर्षांपासून बोजा पडला आहे. त्यामुळे अत्यावश्यक कामांनाच महत्त्व दिले जात असून, त्यासाठीच निधी खर्च केला जात आहे. त्यामुळे नगरसेवक निधी आणि प्रभाग सुधारणा निधीची कामे थांबलेली आहेत. स्थायी समितीने मंजूर केलेला अर्थसंकल्पानुसार कामे करावीत, अशी मागणीदेखील स्थायी समितीच्या सदस्यांनी केली होती; परंतु आजही निधी नसल्याचे कारण देऊन प्रशासनाकडून आयुक्तांनी मंजूर केलेल्या अर्थसंकल्पानुसारच कामे सुरू आहेत. जून महिन्यात झालेल्या महासभेत सत्ताधारी शिवसेनेने तब्बल पाच कोटी ४९ लाख ४९ हजारांचा मंजूर केला. विशेष म्हणजे आयत्या वेळी हा प्रस्ताव मंजूर केल्याने त्यावर काहीच चर्चादेखील झालेली नाही. त्यामुळे आयत्या वेळी कोणकोणते प्रस्ताव मंजूर झाले, हेदेखील गुलदस्यात आहे. हा प्रस्ताव ७२ (ब) नुसार मंजूर करून होणारा खर्च २०२१-२२, २०२२-२३ आणि २०२३ -२४ या आर्थिक वर्षात केला जाणार असल्याचेही या प्रस्तावात नमूद केले आहे. वास्तविक पाहता यंदा सादर झालेल्या अर्थसंकल्पात या विषयाची कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे हा खर्च कसा केला जाणार हादेखील आता सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, २०१९ मध्ये या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. त्यावेळी कलम ७३ नुसार याचे काम केले जाणार होते. त्यानुसार हा खर्च २०२०-२१, २०२१-२२ आणि २०२२-२३ या आर्थिक वर्षात केला जाणार होता. आता त्यात बदल करून नियोजन केले आहे; परंतु हा खर्च कसा केला जाणार याचे उत्तर अनुत्तरित आहे.
....
काही महिन्यांपूर्वी ४५५ कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली होती. त्यामध्ये अनेक महत्त्वाची कामेही घेतली होती; परंतु या खर्चावरूनदेखील वादंग निर्माण झाला होता. विशेष बाब म्हणजे या खर्चामध्येही रंगमंचाच्या कामाच्या खर्चाचा प्रस्ताव मंजुरीसाठी नसल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. त्यामुळे हा खर्च कसा केला जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.