सार्वजनिक बांधकामाचा गाडा आजही ठाण्यातूनच
By admin | Published: September 1, 2015 11:52 PM2015-09-01T23:52:18+5:302015-09-01T23:52:18+5:30
पालघर जिल्हानिर्मितीनंतर वर्षभराचा कालावधी लोटल्या नंतर पालघरमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयाचे उद्घाटन आदिवासी विकासमंत्री
पालघर : पालघर जिल्हानिर्मितीनंतर वर्षभराचा कालावधी लोटल्या नंतर पालघरमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयाचे उद्घाटन आदिवासी विकासमंत्री तथा पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. तरीही या कार्यालयाचा कारभार आजही ठाणे जिल्ह्यातूनच सुरू असल्याने रस्ते व इतर विकासात्मक कामांसंदर्भात अनेक अडचणी निर्माण होत आहेत.
पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू, वसई, तलासरी हे तालुके पश्चिम किनारपट्टीला जोडलेले असून तेथे मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण सुरू आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या तालुक्यासाठी रस्ते जोडण्याच्या दृष्टीने मोठा कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने कार्यकारी अभियंता व त्यांच्या हाताखाली अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली असली तरी हे अधिकारी ठाणे कार्यालयातच असतात.
पालघर जिल्हानिर्मितीनंतर जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद व पोलीस अधीक्षक ही तीन कार्यालये आठ दिवसांत सुरू झाल्यानंतर पुढील तीनचार महिन्यांत कृषी, शिक्षण विभाग, माहिती कार्यालय, समाजकल्याण अधिकारी, जिल्हा नियोजन, कोषागार इ. महत्त्वपूर्ण कार्यालये कार्यरत होऊन कारभारही सुरू झाला. परंतु, परिवहनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालयही १ जुलै २०१५ रोजी सुरू करण्यात आले. परंतु, त्याचा कारभार मात्र अजूनपर्यंत ठाणे कार्यालयातून हाकण्यात येतो आहे. (वार्ताहर)