पारंपरिक पर्यावरणस्नेही कंदिलांंचाच ठाण्यात बोलबाला; कोरोनामुळे यंदा केवळ ३० टक्के कंदीलच विक्रीला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2020 12:16 AM2020-11-01T00:16:49+5:302020-11-01T00:17:18+5:30
Thane : नवरात्रोत्सवानंतर वेध लागले ते दिवाळी सणाचे. अवघ्या १२ दिवसांवर हा सण येऊन ठेपला आहे. नोव्हेंबरच्या दुसरा आठवड्यात दिवाळी आली आहे. यानिमित्ताने घरात साफसफाईस सुरुवात झाली आहे.
ठाणे : अवघ्या काही दिवसांवर दिवाळी हा सण आला आहे. परंतु, या सणावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे कंदिलांची खरेदी होईल की नाही, या भीतीने केवळ ३० ते ४० टक्केच कंदील विक्रीसाठी उपलब्ध केले आहे. ठाणेकरांची कायम पसंती असलेल्या पर्यावरणस्नेही कंदिलांचाच बोलबोला ठाण्याच्या बाजारपेठांत पाहायला मिळत आहे. सध्या मोठ्या कंदिलांचे बुकिंग झालेे असून शेवटच्या दिवसांत घरी लावण्यात येणारे कंदिलांची विक्री होईल, अशी शक्यता विक्रेत्यांनी वर्तवली आहे.
नवरात्रोत्सवानंतर वेध लागले ते दिवाळी सणाचे. अवघ्या १२ दिवसांवर हा सण येऊन ठेपला आहे. नोव्हेंबरच्या दुसरा आठवड्यात दिवाळी आली आहे. यानिमित्ताने घरात साफसफाईस सुरुवात झाली आहे. कोरोनामुळे हळूहळू का होईना बाजारपेठाही सजण्यास सुरुवात झाली आहेत, ठिकठिकाणी कंदिलांव्यतिरिक्त रांगोळी, उटणे, पणत्या, फराळांनी बाजारपेठांमध्ये विक्री होईल. अद्यापही कोरोनाचे सावट गेले नसल्याने ठाणेकरांनी यंदा दिवाळी साधेपणाने साजरी करण्याचे ठरविले आहे. यावेळेस खरेदीविक्रीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
ठाणेकरांना नेहमीच पारंपरिक कंदील आकर्षित करीत असतात. त्यामुळे या कंदिलातच विविध प्रकार बनविण्यात आले आहे. त्यात चारकोन, पंचकोन, षटकोन, सप्तकोन, अष्टकोन, मटकी हे प्रकार पाहायला मिळत आहे. गेल्यावर्षीप्रमाणे यंदा पारंपरिक कंदिलांनाच मागणी आहे. कपडा, बांबू, लाकडाच्या पट्ट्यांपासून ते बनविले आहेत. तीन इंचांपासून पाच फुटांपर्यंतचे कंंदील तयार केले असून २० रुपयांपासून दोन हजारांपर्यंत उपलब्ध आहेत.
फ्लोरोसन्स कलरची भुरळ
नेहमीच्या रंगांना बाजूला सारत कंदिलांमध्ये फ्लोरोसन्स कलर पाहायला मिळत आहे. या रंगाच्या कंदिलांनी ठाणेकरांना भुरळ घातली आहे. मल्टिमिक्स रंगांचे कंदीलही विक्रीसाठी आहेत. यामध्ये यंदा निळा रंग प्रामुख्याने पाहायला मिळत आहे. पारंपरिक कंदिलांप्रमाणे बांबू, झुंबर, चेंडू कंदील यात पाहायला मिळत आहे.
चायनाच्या वस्तू बंद व्हाव्यात आणि गल्लोगल्ली पारंपरिक भारतीय कंदील दिसावे, हा आमचा उद्देश आहे. कोरोनामुळे कंदील खरेदी होईल की नाही, ही शंका असल्याने यंदा ३० टक्केच कंदील बनविले आहे.
- कैलाश देसले,
हस्तकलाकार