प्रशासकीय राजवटीतही नालेसफाईबाबत अधिकारी निद्रावस्थेत; प्रस्ताव तयार करण्यासाठी होतय विलंब
By पंकज पाटील | Published: April 12, 2023 05:45 PM2023-04-12T17:45:55+5:302023-04-12T17:46:15+5:30
अंबरनाथ शहरातील लहान आणि मोठे नालेसफाई करण्यासाठी दरवर्षी निविदा प्रक्रिया राबविण्यात येते. मात्र दरवर्षी नालेसफाईची निविदा ही शेवटच्या क्षणाला म्हणजे जून महिन्यात काढली जात असल्याने प्रत्यक्ष नालेसफाईच्या कामाला जुलै महिना उजाडत असतो.
अंबरनाथ: अंबरनाथ शहरातील नालेसफाई बाबत पालिका प्रशासन बोटचेपी धोरण अवलंबत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई होणे अपेक्षित असतानाही अद्याप पालिका प्रशासनाने नालेस सफाईच्या कामाला तांत्रिक मंजुरी घेतलेली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा नालेसफाईची निविदा प्रक्रिया करण्यास विलंब होणार आहे.
अंबरनाथ शहरातील लहान आणि मोठे नालेसफाई करण्यासाठी दरवर्षी निविदा प्रक्रिया राबविण्यात येते. मात्र दरवर्षी नालेसफाईची निविदा ही शेवटच्या क्षणाला म्हणजे जून महिन्यात काढली जात असल्याने प्रत्यक्ष नालेसफाईच्या कामाला जुलै महिना उजाडत असतो. गेल्या वर्षी नालेसफाईची निविदा प्रक्रिया विलंबाने राबवली गेल्याने या नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या होत्या. भर पावसात नाले सफाईचे काम पालिका प्रशासनाला करावे लागले होते. गेल्या वर्षीच्या झालेल्या चुकानमधून कोणताही बोध पालिकेच्या अधिकाऱ्यांनी घेतलेला नाही. प्रशासकीय राजवट असल्यामुळे प्रत्येक प्रस्ताव मंजूर होण्यासाठी कोणतेही अडचण नसताना अद्याप पालिकेच्या अधिकाऱ्यानी नालेसफाईच्या कामाची तांत्रिक मंजुरी मिळवलेली नाही. त्यामुळे ही तांत्रिक मंजुरी मिळणार कधी आणि निविदा प्रक्रिया राबवली जाणार कधी असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
शहरातील नाल्यांची स्वच्छता करण्यासाठी किमान 20 ते 25 दिवसांचा कालावधी ठेकेदाराला मिळणे अपेक्षित आहे. मात्र निविदा प्रक्रियाच विलंब राबवली जात असल्यामुळे ठेकेदाराला येण पावसाळ्यात काम करण्याची वेळ येत आहे. दरवर्षी नालेसफाईच्या कामाला विलंब होत असताना पालिकेच्या अधिकाऱ्यांनी किमान यंदा तरी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातच निविदा प्रक्रियेबाबत कार्यवाही करणे अपेक्षित होते. मात्र नालेसफाई सारख्या महत्त्वाच्या कामासाठी पालिकेच्या अधिकाऱ्यांना वेळच नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम भागात मोठे नाले सफाई करण्यासाठी यंत्राचा वापर केला जातो, तर लहान नाले सफाईसाठी कामगारांची नेमणूक केली जाते. प्रत्यक्षात लहान नाल्यांची सफाई करण्यात पालिकेचे कर्मचारी कामचुकारपणा करत असल्यामुळे अनेक नाले तुंबून नागरिकांच्या घरात पाणी जात असल्याच्या तक्रारी वाढत आहे. त्यामुळे लहान नाल्यांची स्वच्छता करण्यासाठी देखील स्वतंत्रपणे ठेकेदार नेमून त्यांच्या मार्फत योग्य पद्धतीने काम करून घेण्याची गरज व्यक्त होत आहे.