मुलांच्या हस्ते कार्यक्रमांचा धडाका, नगरसेवकांची मुले अन् पत्नीसाठी मोर्चेबांधणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 05:40 PM2022-03-01T17:40:23+5:302022-03-01T17:40:51+5:30
उल्हासनगर महापालिका अस्तित्वात आल्यानंतर पालिकेवर सर्वाधिक सत्ता शिवसेना व मित्र पक्षाची राहिली आहे.
सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिका निवडणुकीत ४ ते ५ वेळा सलग नगरसेवकपदी निवडून येणाऱ्या दबंग नगरसेवकांनी आपली मुले व पत्नीचे नशीब अजमाविण्यासाठी विविध हातखंडे वापरण्यास सुरुवात केल्याचे चित्र शहरात दिसते. दंबग नगरसेवकांच्या मुलांचे नाव पुढे आल्याने, निष्ठावंत कार्यकर्त्यात हलचल निर्माण झाली आहे.
उल्हासनगर महापालिका अस्तित्वात आल्यानंतर पालिकेवर सर्वाधिक सत्ता शिवसेना व मित्र पक्षाची राहिली आहे. गणेश चौधरी हे महापालिकेचे व शिवसेनेचे पाहिले महापौर राहिले असून चौधरी यांच्यानंतर शिवसेनेच्या यशस्विनी नाईक, विद्या निर्मल, राजश्री चौधरी, अपेक्षा पाटील, लिलाबाई अशान आदींनी महापौर पद भूषविले आहे. शिवसेनेसह भाजप, राष्ट्रवादी पक्षातील काही दबंग नगरसेवक सातत्याने निवडून येत असून त्यापैकी सी ब्लॉक परिसरातून निवडून येणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेवकांने मुलाला निवडणूक रिंगणात उतरण्याचा चँग बांधला असून त्याच्या हस्ते विविध विकास कामाचे उदघाटन मुलांच्या हस्ते केले जात आहे. तीच परिस्थिती बिर्ला मंदिर परिसरातून निवडून येणाऱ्या शिवसेना नागरसेविकाच्या मुलाची आहे. सोनार गल्लीतून भाजप नागरसेविकेचा मुलगा, गोलमैदान परिसरातून भाजप आमदार व माजी महापौराचा मुलगा, सीब्लॉक मधून शिवसेना नागरसेवकांचा मुलगा, ओटी सेक्शन कॅम्प नं-४ मधून शिवसेना नगरसेवकांचा मुलगा यांच्या हस्ते विविध उपक्रम राबवित आहे.
कॅम्प नं-४ संभाजी चौक परिसरातून नगरसेवकांचा मुलगा, कॅम्प नं-५ परिसरातून राष्ट्रवादी नागरसेविकेचा भाऊ, कैलास कॉलनी मधून शिवसेनेच्या वाटेवर असलेल्या भाजप नगरसेवकांचा मुलगा, कुर्ला कॅम्प मधून काँग्रेस नगरसेविकेचा मुलगा, जुना बस स्टॉप मधून भाजप नगरसेवकांचा मुलगा इच्छुक आहेत. दबंग नगरसेवकांनी आपल्या मुलाचा प्रचार सुरू केल्याचे चित्र आहे. महापालिकेत सलग ५ ते ६ वेळा सलग नगरसेवक पदी निवडून आल्यावर, त्यांनी मुले व पत्नीसाठी पुढाकार घेतल्याचे चित्र शहरात आहे.
दबंग नगरसेवकांविरोधात नाराजी?
सलग ३ टर्म पेक्षा जास्त वेळा नगरसेवक पदी निवडून आलेल्यांना पक्षाने तिकीट देऊ नये. अशी मागणी पक्षाकडे इच्छुक उमेदवार करीत असून त्यांचे मुले, पत्नी व जवळच्या नातेवाईकांना तिकीट पक्षाने नाकारावे. असा मतप्रवाह निर्माण झाला आहे.