जून महिन्यात सर्पदंशाच्या घटनांनी गाठली शंभरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 12:21 AM2019-08-04T00:21:39+5:302019-08-04T00:21:51+5:30
ठाणे : ठाणे जिल्ह्यात मागील सहा महिन्यांत सर्पदंशाच्या एकूण २८३ घटना घडल्या आहेत. यामध्ये २८१ जणांचे प्राण वाचवण्यात रुग्णालय ...
ठाणे : ठाणे जिल्ह्यात मागील सहा महिन्यांत सर्पदंशाच्या एकूण २८३ घटना घडल्या आहेत. यामध्ये २८१ जणांचे प्राण वाचवण्यात रुग्णालय प्रशासनाला यश आले. तर, दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यातच जून या एकाच महिन्यात सर्पदंशाच्या घटनांनी शंभरी गाठली आहे. तर, विंचूदंशाच्या ४० रुग्णांवर योग्य उपचार झाल्याने ते सुखरूप घरी परतले असून सुदैवाने विंचूदंशाच्या घटनेत कोणीही दगावले नसल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासन सूत्रांनी दिली.
ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात उन्हाळ्यात जमीन अधिकच तापल्यावर सरपटणारे साप, विंचू यासारखे प्राणी थंड जागा शोधण्यासाठी बिळाबाहेर पडत असतात. त्याचप्रमाणे पावसाळ्यातही साप, विंचू यासारखे प्राणी बिळातून सुरक्षितस्थळी धाव घेतात. याचदरम्यान, या सरपटणाऱ्या प्राण्यांचा माणसांशी संपर्क आल्यास ते स्वत:चा जीव वाचवण्यासाठी फणा किंवा नांगी काढतात. ठाणे जिल्ह्यात जानेवारी ते जून २०१९ या सहा महिन्यांत ठाणे जिल्हा रु ग्णालयात सर्पदंश झालेल्या २८३ पैकी दोघांचा मृत्यू झाला आहे.
सहा महिन्यांत दोघांचा सर्पदंशाने मृत्यू झाला असल्याचे कबूल करून रुग्णालयात सर्प असो किंवा विंचू किंवा श्वानदंशांवरील औषधाचा पुरेपूर साठा आहे. संबंधित विभाग हा नेहमीच उपचारार्थ सज्ज असतो.
- डॉ. कैलाश पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे