अखेर 'त्या' तरुणावर झाले अंत्यसंस्कार, जिवंत करण्यासाठी मृतदेह ठेवला होता चर्चमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2017 07:42 PM2017-11-07T19:42:57+5:302017-11-07T19:43:21+5:30
चिंचपोकळी येथील तरुणाचा कर्करोगाने मृत्यू झाल्यावर त्याला जिवंत करण्याचा प्रयत्न गेल्या 10 दिवसांपासुन सुरु होता. हा प्रकार पोलिसांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्या तरुणाच्या कुटुंबीयांना मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचा सल्ला दिला होता.
- पंकज पाटील
अंबरनाथ : चिंचपोकळी येथील तरुणाचा कर्करोगाने मृत्यू झाल्यावर त्याला जिवंत करण्याचा प्रयत्न गेल्या 10 दिवसांपासुन सुरु होता. हा प्रकार पोलिसांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्या तरुणाच्या कुटुंबीयांना मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचा सल्ला दिला होता. मात्र दोनवेळा पोलिसांनी हस्तक्षेप करुन देखील त्या तरुणावर अंत्यसंस्कार करण्यात आले नव्हते. याप्रकरणी मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिका-यांनी हस्तक्षेप करुन कुटुंबीयांना त्या तरुणावर अंत्यसंस्कार करण्यास भाग पाडले आहे. तर दुसरीकडे या अंधश्रद्धेप्रकरणी आता अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्यकर्ते सक्रिय झाले असून त्यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
मुंबईच्या चिंचपोकळी येथे राहणारा मिशाख नेव्हीस् हा तरुणाचा कर्करोगाने 27 ऑक्टोबरला मृत्यू झाला होता. त्याचे वडील हे मुंबईच्या नागपाडा येथील जीजस फॉर ऑल नेशनस् चर्चचे बिशप आहेत. आपल्या तरुण मुलाचा मृत्यू झाल्याने वडीलांनी त्याला पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न सुरु केला. नागपाडा येथील चर्चमध्ये मिशाख याला 27 ऑक्टोबर रोजी ठेवण्यात आले. चर्चमध्ये प्रार्थना केल्यावर जिजस त्याच्यामध्ये पुन्हा प्राण टाकेल अशी अंधश्रध्दा त्यांची होती. 9 दिवस चर्चमध्ये ठेवल्यावर त्याची चर्चा नागपाडा भागात झाल्यावर पोलीसांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला. या तरुणावर अंत्यसंस्कार करण्याच्या सुचना दिल्या. मात्र मिशाख यांच्या कुटुंबीयांनी प्रार्थना सुरुच ठेवण्याचा निर्णय घेला. नागपाडा येथे चर्चा झाल्याने त्यांनी हा मृतदेह थेट अंबरनाथ येथील जीजस फॉर ऑल नेशनस् चर्चमध्ये आणले. 5 नोव्हेंबरला पहाटे 5 वाजता पुन्हा अंबरनाथच्या चर्चेमध्ये प्रार्थना सुरु करण्यात आली. दिवसभर या तरुणाला जिवंत करण्याचे प्रयत्न बिशप यांनी केले. या प्रकरणाची माहिती अंबरनाथ पोलीसांना मिळाल्यावर त्यांनी देखील त्यांना या तरुणावर अंत्यसंस्कार करण्याचा सल्ला दिला. अंबरनाथ पोलिसांना त्या तरुणाच्या कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार करतो असे सांगून हा मृतदेह पुन्हा मुंबईला नेला. मात्र मुंबईला त्याच्यावर अंत्यसंस्कार होतील अशी समज पोलिसांना होती. मात्र मंगळवारी दिवसभर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले नाही. अखेर मुंबई पोलिसांनी या कुटुंबीयांची समजूत घालत त्या तरुणावर अंत्यसंस्कार करण्यात भाग पाडले. मुंबईच्या डोंगरी परिसरात त्या तरुणावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त विरेंद्र मिश्र यांनी स्पष्ट केले.
या घटनेनंतर आता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने पुढाकार घेत या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. संबंधीत चर्च आणि त्यांना सहकार्य करणा-यांवर कायदेशिर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
मृत व्यक्तीला जिवंत करण्याचे प्रयत्न गेल्या 10 दिवसांपासून सुरु आहे. हे अत्यंत चुकीचे आहे या संदर्भात मुंबई पोलीसचे सह आयुक्त देवेन भारती यांची भेट घेण्यात आली असून त्यांनी या प्रकरणात योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.