अखेर परिवहनचे उत्पन्न वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 02:14 AM2018-05-24T02:14:42+5:302018-05-24T02:14:42+5:30
लागू झाली मात्रा : बसफेऱ्या वाढवण्याचा अॅक्शन प्लॅन तयार
कल्याण : कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमास महापालिकेकडून निधी देऊनही उत्पन्न सुधारत नव्हते. अखेरचा पर्याय म्हणून परिवहनच्या खाजगीकरणाचा इशारा त्यांना देण्यात आला. त्यानंतरही ‘परिस्थिती जैसे थे’ राहिल्याने खाजगीकरणाचा निर्णय घेतला जाईल, असे सांगताच उत्पन्नात तातडीने वाढ झाली.
परिवहन उपक्रमाला घरघर लागलेली आहे. २१८ बसेस असूनही वाहक - चालकांअभावी सगळ्या बसेस रस्त्यावर धावू शकत नाहीत. वाहक व चालकांच्या भरतीचा मुद्दा प्रलंबित आहे. त्यासोबतच त्यांच्या दांड्या मारण्याचे प्रमाणही जास्त आहे. कार्यशाळेत तांत्रिक कर्मचारी नाहीत. बसेस नादुरुस्त होतात. तसेच ब्रेक डाऊनही होतात. या सगळ्यावर मात करण्याची अधिकारी वर्गाची मानसिकता नाही. त्यामुळे महापालिकेच्या अनुदानावर किती दिवस हा उपक्रम चालू ठेवणार?, तो बंद करण्याऐवजी प्रवाशांची सेवा सुरू ठेवत त्याचे खाजगीकरण करायचे. त्याशिवाय कामचुकार आणि निर्ढावलेल्या अधिकारी वर्गाचे डोळे उघडणार नाहीत, असा इशारा चार महिन्यांपूर्वी स्थायी समिती सभापती राहूल दामले यांनी दिला होता. त्यांच्या इशाºयानंतरही परिस्थिती तशीच राहिली. २४ वाहक-चालक दांडीबहाद्दर असल्याने बसेस पुरेशा प्रमाणात रस्त्यावर निघत नव्हत्या. त्यामुळे दिवसाला ३ लाख ५० हजार इतकेच उत्पन्न मिळत होते. परिणामी, उत्पन्न वाढीचा अॅक्शन प्लान सादर करण्याचे आदेश सभापती दामले यांनी परिवहन व्यवस्थापक देवीदास टेकाळे यांना दिले होते. त्यासाठी त्याना केवळ १५ दिवसांचा अवधी दिला. हा अॅक्शन प्लान तयार करुन त्याची अंमलबजावणी झाली नाही, तर खाजगीकरणाचा निर्णय घेतला जाईल यावर पदाधिकारी ठाम असल्याचे बजावले होते. आणि साडेतीन लाखांवरून दिवसाला ४ लाख ७६ हजार रुपये मिळू लागले. पंधरा दिवसाच्या अल्टीमेटमुळे इतका फरक पडला आहे. पुढील अल्टिमेटम हा ३० मे रोजीचा आहे. पाच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न दिवसाला मिळायला हवे, असे बजावले आहे. हे उत्पन्न आता दिवसाला आठ लाखांच्या घरात नेण्याचा मानस दामले यांनी व्यक्त केला आहे.
परिवहनचे व्यवस्थापक देवीदास टेकाळे यांनी ४१ मोठा आकाराच्या बसेस उत्पन्नाच्या मार्गावर काढण्याचा अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. त्यात वाशी, पनवेल, नवी मुंबई, कोकण भवन, भिवंडी, डोेंबिवली निवासी, कल्याण मलंगगड या मार्गावर या बसेस काढल्या जातील. त्याचबरोबर १५ मिनी बसेसही उत्पनाच्या मार्गावर काढल्या जातील. तसेच खाजगी कंत्राटदाराकडून वाहक व चालक घेऊन आणखीन १५ बसेस उत्पन्नाच्या मार्गावर चालविण्याचा अॅक्शन प्लॅन टेकाळे यांनी दिला आहे.
प्रत्येक गाडीला जीपीएस लावणार...
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या घनकचरा वाहक गाड्यांना जीपीएस यंत्रणा बसवली आहे. त्याच धर्तीवर परिवहनमधील सगळ््या बसेसना जीपीएस प्रणाली बसविणार. च्त्यामुळे कोणती बस कोणत्या मार्गावर धावत आहे. तिच्या किती फेºया होताहेत. ती वाहतूक कोंडीत अडकली आहे का याचे सगळे मोजमाप होऊन परिचलनावर आॅनलाईन देखरेख ठेवता येईल.