अखेर ठाण्यातील त्या सराफाचीही हत्या करून मृतदेह खाडीत फेकल्याचे उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:46 AM2021-08-21T04:46:03+5:302021-08-21T04:46:03+5:30

ठाणे: ठाण्यातील सोने-चांदीच्या दागिन्यांचे व्यापारी भरत हरितमल जैन (४३, रा. नीळकंठ सोसायटी, मखमली तलाव, ठाणे) यांचा मृतदेह कळवा आणि ...

Eventually, it was revealed that the bullion man from Thane was also killed and his body was thrown into the creek | अखेर ठाण्यातील त्या सराफाचीही हत्या करून मृतदेह खाडीत फेकल्याचे उघड

अखेर ठाण्यातील त्या सराफाचीही हत्या करून मृतदेह खाडीत फेकल्याचे उघड

googlenewsNext

ठाणे: ठाण्यातील सोने-चांदीच्या दागिन्यांचे व्यापारी भरत हरितमल जैन (४३, रा. नीळकंठ सोसायटी, मखमली तलाव, ठाणे) यांचा मृतदेह कळवा आणि नारपोली पोलीस ठाण्याच्या सीमेवरील खाडीत हातपाय बांधलेल्या अवस्थेमध्ये शुक्रवारी मिळाला. खुनानंतर त्यांना खाडीमध्ये फेकल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

कळवा खाडीमध्ये शुक्रवारी आढळलेला अनोळखी मृतदेह म्हणजे ठाण्यातून पाच दिवसांपूर्वी बेपत्ता झालेले सोने-चांदीच्या दागिन्यांचे व्यापारी भरत हरितमल जैन यांचाच असल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले. जैन यांच्या नातेवाइकांनीही त्यांचे कपडे तसेच पॅन्टच्या खिशामध्ये मिळालेल्या त्यांच्या मोटारीच्या चावीवरून त्यावर शिक्कामोर्तब केले. नीळकंठ सोसायटीमध्ये वास्तव्याला असलेल्या जैन यांचे चरईतील दगडी शाळेजवळ दत्त अपार्टमेंटमध्ये बी. के. ज्वेलर्स हे दुकान आहे. १४ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ज्वेलर्सच्या दुकानात जात असल्याचे पत्नीला त्यांनी सांगितले. त्यानंतर मात्र, ते परतलेच नाही. ते न परतल्यामुळे तसेच शोध घेऊनही ते न सापडल्यामुळे कुटुंबीयांनी अखेर १५ ऑगस्ट रोजी याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात त्यांच्या अपहरणाची तक्रार दाखल केली होती. यापूर्वीही व्यापारी मनसुख हिरेन हे बेपत्ता झाल्यानंतर त्यांचा मृतदेह मुंब्रा खाडीत आढळला होता. त्यामुळेच या प्रकरणाचाही पोलिसांनी गांभीर्याने तपास करावा. यात घातपाताचा संशय असून दुकानात जबरी चोरीनंतर कोणीतरी त्यांचे अपहरण केल्याची शक्यताही भरत यांचे भाऊ सुनील जैन यांनी व्यक्त केली होती. दुर्दैवाने २० ऑगस्ट रोजी देखील कळवा पोलिसांना अनोळखी मृतदेह खाडीत मिळाला. मृतदेह कुजल्यामुळे तो ओळखण्याच्या पलीकडे होता. त्याच्या हातापायांना दोरीने बांधलेले आढळल्यामुळे जैन यांच्या कुटुंबीयांनाही बोलावण्यात आले. मृतदेह कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठविला होता. तिथेच जैन यांचे भाऊ आणि पत्नीने तो सायंकाळी उशिरा ओळखल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Eventually, it was revealed that the bullion man from Thane was also killed and his body was thrown into the creek

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.