अखेर कर्मचाऱ्यांना मिळाला गणवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:27 AM2021-06-17T04:27:31+5:302021-06-17T04:27:31+5:30
बदलापूर: गेल्या दोन वर्षांपासून गणवेश व पावसाळी साहित्याच्या प्रतीक्षेत असलेल्या कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना अखेर हे साहित्य उपलब्ध करून ...
बदलापूर: गेल्या दोन वर्षांपासून गणवेश व पावसाळी साहित्याच्या प्रतीक्षेत असलेल्या कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना अखेर हे साहित्य उपलब्ध करून देण्यास सुरुवात झाली आहे. या गोष्टी वेळेवर मिळत नसल्याची बाब समोर आली होती.
कुळगाव-बदलापूर नगरपालिकेतील महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेनेच्या नगरपरिषद युनिट अध्यक्ष संगीता चेंदवणकर, कार्याध्यक्ष उमेश तावडे, सरचिटणीस भाई जाधव, अंबरनाथ-बदलापूर प्रभारी उपाध्यक्ष सूर्यकांत अनार्थे आदींनी एप्रिल महिन्याच्या अखेरीस नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात मुख्याधिकारी दीपक पुजारी यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी कर्मचाऱ्यांना गेल्या दोन वर्षांपासून गणवेश व पावसाळी साहित्य मिळालेच नसल्याचे या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर तातडीने या संदर्भात कार्यवाही करण्याचे आदेश आस्थापना विभागाला दिले होते. त्यानुसार, प्रशासनाच्या वतीने कर्मचाऱ्यांना गणवेश, तसेच पावसाळी साहित्य वाटपास सुरुवात झाली आहे. मंगळवारी ४८ कर्मचाऱ्यांना या साहित्याचे वाटप करण्यात आले. उर्वरित कर्मचाऱ्यांनाही ते उपलब्ध करून देण्यात येणार आहे.