ठाण्यात दर १८ मिनिटाला भटक्या कुत्र्यांचा चावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 02:41 AM2018-04-30T02:41:40+5:302018-04-30T02:41:50+5:30
ठाण्यात भटक्या कुत्र्यांची दहशत पुन्हा एकदा वाढू लागली असून गेल्या आठवड्यात एकाच दिवशी कुत्र्याने चार जणांना चावा घेतल्याची घटना घडली आहे
ठाणे : ठाण्यात भटक्या कुत्र्यांची दहशत पुन्हा एकदा वाढू लागली असून गेल्या आठवड्यात एकाच दिवशी कुत्र्याने चार जणांना चावा घेतल्याची घटना घडली आहे. ठाण्यात दर अठराव्या मिनिटाला भटका कुत्रा एकाचा चावा घेत असल्याची धक्कादायक माहिती माहिती अधिकाराद्वारे उघड झाली आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत २००४ पासून आतापर्यंत ५० हजारांहून अधिक भटक्या कुत्र्यांवर निर्बिजीकरण शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. परंतु, अद्यापही सुमारे १५ हजार कुत्र्यांवरील शस्त्रक्रिया बाकी असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
मागील वर्षी एकाच महिन्यात भटक्या कुत्र्यांनी १३०० जणांचे लचके तोडले. मागील कित्येक वर्षांपासून या या कुत्र्यांचा सर्व्हे होणे बाकी आहे. शहरात आजमितीला नेमके किती भटके कुत्रे आहेत, याची माहिती आरोग्य विभागाला नाही. सर्व्हेच्या प्रस्तावाला २०१५ मध्ये मंजुरी मिळाली. परंतु, अद्यापही तो झालेला नाही. शहराची लोकसंख्या २२ लाखांच्या आसपास असून या लोकसंख्येच्या दोन ते तीन टक्के भटक्या कुत्र्यांची संख्या असू शकते, असा अंदाज आहे. तसेच कुत्र्यांची जननक्षमता लक्षात घेता अंदाजे प्रतिमहिना २५० ते ३०० कुत्र्यांवर निर्बिजीकरण शस्त्रक्रिया केल्या जातात.
परंतु, असे असले तरी आजही भटक्या कुत्र्यांची दहशत कायम आहे. आता मुंबईच्या वेशीवरील कुत्रेदेखील ठाण्यात आणून सोडले जात असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. त्यांची दहशत केवळ हिरानंदानी भागातच नव्हे तर अनेक झोपडपट्टी भागांत दिवसेंदिवस ती वाढत आहे.
महापालिका हद्दीतील सुमारे १५ हजार भटक्या कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करणे शिल्लक असल्याचा दावा करण्यात येत असला, तरी प्रत्यक्षात पालिका हद्दीत कुत्र्यांची संख्या सुमारे ७५ ते ८० हजार असल्याचे दावे केले जात आहेत. यासंदर्भात सत्यजित शहा यांना माहिती अधिकारात सांगितलेला तपशील धक्कादायक आहे. मागील काही वर्षांत श्वानदंशांच्या घटनांमध्ये वाढ तर झाली आहेच, शिवाय चावा घेण्याचा कालावधीही कमी झालेला आहे. २०१०-११ मध्ये कुत्र्याच्या दोन चाव्यांमधील अंतर ५३ मिनिटांचे होते. २०१७ मध्ये ते ३५ मिनिटांवर आले. तर, आजघडीला ते १८ मिनिटांवर आले आहे. पालिकेने श्वानदंशाची जी आकडेवारी दिली आहे त्यात केवळ शासकीय रुग्णालयांत उपचार घेणाऱ्यांचीच संख्या आहे. खाजगी दवाखान्यांचा उल्लेख नाही. त्यामुळे श्वानदंशाच्या दोन घटनांमधील अंतर याहून कमी असू शकते.