दर महिन्याला आरटीआयचे ४०० अर्ज, ठाणे पालिकेतील आकडेवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 01:50 AM2017-11-08T01:50:28+5:302017-11-08T01:50:42+5:30
ठाणे महापालिकेचे कंत्राटदार संकेत जाधव यांनी रविवारी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केल्यानंतर आता पालिकेत माहिती मागणारे तथाकथित माहिती अधिकार कार्यकर्तेदेखील उजेडात येण्याची शक्यता आहे.
ठाणे : ठाणे महापालिकेचे कंत्राटदार संकेत जाधव यांनी रविवारी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केल्यानंतर आता पालिकेत माहिती मागणारे तथाकथित माहिती अधिकार कार्यकर्तेदेखील उजेडात येण्याची शक्यता आहे.
जाधव यांना या कथीत कार्यकर्त्यांचादेखील त्रास असल्याची भीती मित्रमंडळींनी व्यक्त केल्याने, आता ते अडचणीत येण्याची शक्यता वाढली आहे. दीड महिन्यापूर्वीच आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अशा आरटीआय कार्यकर्त्यांची माहिती मागविली होती. त्यानुसार येत्या चार ते पाच दिवसात वादग्रस्त पद्धतीने माहिती मागविणाºया कथित माहिती अधिकार कार्यकर्त्यांची संपूर्ण माहिती समोर येणार आहे.
जाधव यांनी आत्महत्या केल्यानंतर पालिकेतील अर्थकारण पुन्हा एकदा समोर आले आहे. आजी माजी नगरसेवकांनी कामात खोडा घालण्याचा प्रयत्न, पालिकेतील तथाकथीत आरटीआय कार्यकर्त्यांचे ब्लॅकमेलींग, शिवाय चाकण येथील गृहप्रकल्पाच्या मुद्यावरून जाधव अस्वस्थ असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी आणि त्यांच्या मित्रमंडळीनी व्यक्त केली. काही वर्षापासून पालिकेत अशा आरटीआय कार्यकर्त्यांची चलती असल्याचे दिसते. पालिकेतील कामांची माहिती मागवायची त्यानंतर अधिकारी, विकासक, ठेकेदारांना ब्लॅकमेल करणारी मोठी साखळी कार्यरत आहे. पालिका आयुक्तांनी वादग्रस्त पद्धतीने माहिती मागविणाºया आरटीआय कार्यकर्त्यांची माहिती दीड महिन्यापूर्वी अधिकाºयांकडून मागवली होती. यानुसार प्रत्येक विभागाकडून तशी माहिती गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे आस्थापना विभागाने स्पष्ट केले. पालिका मुख्यालय, प्रभाग समिती, आॅनलाईन पद्धतीने आलेल्या अर्जांची छाननी केली जाणार आहे. सध्या तीन ते चार विभागांची माहिती अद्याप उपलब्ध न झाल्याने पुढील दिशा ठरविण्यात आली नसल्याचेही सांगण्यात येते. यात एखाद्या माहिती अधिकार कार्यकर्त्याने वादग्रस्त माहिती मागितली असेल तर त्यांची नावे शोधली जाणार आहेत. एकाच व्यक्तीने किती वेळा कोणकोणत्या विभागात कशा पद्धतीने अर्ज केले आहेत, याचीदेखील माहिती गोळा केली जात आहे. त्यानुसाार पुढील चार ते पाच दिवसात ती गोळा करुन त्यानुसार पुढील दिशा ठरविली जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.