शहरातील प्रत्येक रिक्षा चालक एक स्वच्छता दुत बनू शकतो : आयुक्त काटकर
By धीरज परब | Published: October 11, 2023 05:47 PM2023-10-11T17:47:45+5:302023-10-11T17:47:55+5:30
शहरातील सर्व रिक्षा चालक हा एक स्वच्छता दुत बनू शकतो अशी अपेक्षा आयुक्त संजय काटकर यांनी व्यक्त केली.
मीरारोड - मीरा भाईंदर महानगरपालिका व न्यु मिरा भाईंदर रिक्षा चालक मालक संघ ट्रेड युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने संवाद स्वच्छतेचा हा उपक्रम साजरा करण्यात आला. शहरातील सर्व रिक्षा चालक हा एक स्वच्छता दुत बनू शकतो अशी अपेक्षा आयुक्त संजय काटकर यांनी व्यक्त केली.
११ ऑक्टोबर रोजी "संवाद स्वच्छतेचा" ही विशेष बैठक आयुक्त तथा प्रशासक संजय काटकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर व संभाजी पानपट्टे, उपायुक्त मारुती गायकवाड, संजय शिंदे व रवि पवार, शहर अभियंता दिपक खांबित, माजी नगरसेवक जुबेर इनामदार, रिक्षा चालक संघाचे प्रतिनिधी, महापालिका कर्मचारी व रिक्षा चालक उपस्थित होते.
शहराच्या स्वच्छतेबाबत आपण सर्व रिक्षा चालक कसे योगदान देऊ शकतात याबाबत ही विशेष बैठक घेण्यात आली. चालत्या रिक्षातून किंवा गाडीतून कचरा फेकणे, गुटखा/पान खाऊन थुंकणे, सिगारेटचे जळते तुकडे फेकणे या सर्व अस्वच्छता पसरवणाऱ्या गोष्टी दररोज रिक्षा चालक पाहत असतो. यावर वेळीच आळा घालण्यासाठी एक सुरुवात स्वतःपासून म्हणून आपण सर्व रिक्षा चालक महापालिकेला सहकार्य करू शकता असे आयुक्त यांनी आवाहन केले.
सर्व रिक्षा चालक हे त्यांच्या दैनंदिन जीवनात रिक्षामधून प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करून शहर स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी महत्त्वाचे कार्य करू शकतात. एखाद्या प्रवाश्या कडून असे कृत्य घडत असल्यास आपण एक स्वच्छता दुत बनून त्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून देऊ शकतो. शहरातील सर्व रिक्षांमध्ये लहान आकाराची कचरा कुंडी लवकर बसवण्यात येणार आहे असे आयुक्त यांनी सांगितले.
प्रत्येक सुजाण नागरिकांनी स्वच्छतेप्रती जागरूक होऊन हे शहर स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी महानगरपालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्त संजय काटकर यांनी केले.