ठाणे महापालिकेच्या प्रत्येक शाळेत मुलांसाठी ग्रंथालय करणार : आयुक्त बांगर यांची घाेषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 06:25 AM2024-02-25T06:25:39+5:302024-02-25T06:26:12+5:30

लोकमत साहित्य महाेत्सवाचे शानदार उद्घाटन; पुस्तक खरेदीला उत्स्फूर्त प्रतिसाद 

Every school of Thane Municipal Corporation will have a library for children: Commissioner Bangar's announcement in Lokmat Sahitya Mahotsav | ठाणे महापालिकेच्या प्रत्येक शाळेत मुलांसाठी ग्रंथालय करणार : आयुक्त बांगर यांची घाेषणा

ठाणे महापालिकेच्या प्रत्येक शाळेत मुलांसाठी ग्रंथालय करणार : आयुक्त बांगर यांची घाेषणा

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : लोकमत साहित्य पुरस्कार विजेत्या सर्व १२ पुस्तकांचे प्रत्येकी दहा संच ठाणे महानगरपालिकेच्या विविध ग्रंथालयांसाठी विकत घेण्याची घोषणा करत, पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी लोकमत साहित्य महोत्सवात आयोजित पुस्तक प्रदर्शनाचे शानदार उद्घाटन केले. आयुक्तांनीच या पुस्तक प्रदर्शनाची एवढी शानदार सुरुवात केली. या प्रदर्शनाला दिवसभर ठाणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. ठाणे महापालिकेच्या प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांकरिता ग्रंथालय सुरू करणार असल्याचेही बांगर यांनी सांगितले. 

मराठी साहित्याचा डंका शनिवारी ठाण्यातील कोरम मॉलमध्ये वाजला. आयुक्त अभिजित बांगर यांनी मराठी साहित्याच्या व्यासंगाबाबत परखड विचार व्यक्त करत ठाणेकरांच्या साहित्यिक प्रेमासाठी पालिका करत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. ज्येष्ठ पत्रकार व लेखक निळू दामले यांनी जागतिकीकरणाच्या प्रचंड वेगात साहित्य, साहित्यिक, तरुण वाचक यांची होत असलेली ओढाताण याचे सम्यक चिंतन केले. मॉलमध्ये खरेदीकरिता आलेले वक्त्यांचे विचार ऐकण्याकरिता थबकले. नंतर त्यांनी पुस्तक प्रदर्शनाकडे मोर्चा वळवला.

लोकमत माध्यम समूहाच्या वतीने ठाणे साहित्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. कोरम मॉलमध्ये शनिवारी सकाळी अकराच्या ठोक्याला शं. ना. नवरे सांस्कृतिक मंचावर ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर, ज्येष्ठ पत्रकार, लेखक निळू दामले, अभिनेते मंगेश देसाई, ख्यातनाम समीक्षक व लेखक डॉ. अनंत देशमुख, जेव्हीएम स्पेसचे संचालक मंथन मेहता, कोरम मॉलचे प्रमुख विकास लध्धा, लोकमतच्या मुंबई आवृत्तीचे संपादक अतुल कुलकर्णी, लोकमतचे उपाध्यक्ष विजय शुक्ला यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलनाने सोहळ्यास प्रारंभ झाला. 

लोकमत साहित्य पुरस्कार समितीचे सदस्य विद्याधर ठाणेकर, दुर्गेश आकेरकर, संगीता कुलकर्णी, प्रा. प्रतीक्षा बोर्डे, प्रकाश बोर्डे हेही हजर होते. लोकमतचे वरिष्ठ सहायक संपादक संदीप प्रधान यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
 

Web Title: Every school of Thane Municipal Corporation will have a library for children: Commissioner Bangar's announcement in Lokmat Sahitya Mahotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Lokmatलोकमत