प्रत्येक बुधवारी ठाणे शहर निर्जळी
By admin | Published: November 4, 2015 12:32 AM2015-11-04T00:32:11+5:302015-11-04T00:32:11+5:30
भातसा धरण व उल्हास नदीच्या उपलब्ध पाणी साठयाच्या नियोजनाबाबत कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग यांनी ३० टक्के पाणी कपात करण्याचे निश्चित केल्याने ठाणे महापालिकेची
ठाणे : भातसा धरण व उल्हास नदीच्या उपलब्ध पाणी साठयाच्या नियोजनाबाबत कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग यांनी ३० टक्के पाणी कपात करण्याचे निश्चित केल्याने ठाणे महापालिकेची स्वत:ची पाणीपुरवठा योजना व स्टेम कंपनीकडून होणारा पाणीपुरवठा बुधवारी बंद ठेवण्यात येणार आहे. दुसरीकडे एमआयडीसीनेही सलग दोन दिवस पाणी कपात करण्यास सांगितल्याने याचा फटका कळवा, मुंब्रा आणि दिवा या भागाला अधिक प्रमाणात बसणार आहे.
बुधवारी सकाळी ९ ते गुरु वार सकाळी ९ पर्यंत घोडबंदर रोड, ठाणे शहर, पाचपाखाडी, ऋतुपार्क, साकेत, महागिरी, लोकमान्यनगर, नौपाडा, उथळसर, वागळे इस्टेट, पातलीपाडा, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, ओवळा, समतानगर, श्रीनगर, इंदिरानगर, गांधीनगर, रेतीबंदर, मुंब्रा कोळीवाडा, शैलेशनगर, बॉम्बे कॉलनी, संजयनगर व कळवा काही भाग या परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
दरम्यान महापालिकेने हे शटडाऊन घेतले असतांनाच एमआयडीसीनेही बुधवार ते शुक्रवार असे दोन दिवसांचे शटडाऊन घेतल्याने याचा परिणाम कळवा, मुंब्रा आणि दिवा भागाला अधिक भेडसावणार आहे. या शटडाऊनमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करून पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
बुधवारी रात्री १२ ते शुक्र वारी रात्री १२ पर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार असून या कालावधीत कळवा, मुंब्रा व दिवा या परिसराचा पाणी पुरवठा (४८ तास) बंद राहणार आहे. (रेतीबंदर, मुंब्रा कोळीवाडा, शैलेशनगर, संजयनगर, बॉम्बे कॉलनी हा भाग वगळून यातून वगळण्यात आला आहे)