दरवर्षी ३२ टक्के रुग्ण हृदयरोगामुळे दगावतात, डॉ. अनुप ताकसांडेंची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 07:50 PM2017-08-18T19:50:35+5:302017-08-18T19:50:44+5:30
- राजू काळे
भाईंदर, दि. १८ - भारतातदरवर्षी होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी तब्बल ३२ टक्के मृत्यू हृदयरोगामुळे होतात आणि यामधील ७० टक्के नागरिकांचा हृदयविकाराचा झटका आल्यांनतर योग्य ते उपचार न केल्यामुळे मृत्यू होते, अशी माहिती मीरारोड येथील वोक्हार्ट रुग्णालयातील हृदयविकार तज्ञ डॉ. अनुप ताकसांडे यांनी एका वैद्यकीय मोहिमेद्वारे दिली.
हृदयविकाराबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी २९ सप्टेंबरला जागतिक हृदयदिन साजरा केला जातो. परंतु, हृदयविकाराची वाढणारी रुग्णाची संख्या पाहता दरमहिन्याला हृदयदिन साजरा करणे आवश्यक वाटू लागल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. अधिक माहिती देताना त्यांनी हृदयाचा झटका अथवा रुग्णाच्या छातीत दुखू लागल्यावर पुढील ५० ते ६० मिनिटे "गोल्डन हवर" असतात. त्या कालावधीत हृदयाच्या स्नायूला रक्त मिळण्यासाठी होत असलेला रक्तवाहिनीतील अडथळा हळूहळू वाढत जातो. सहा तासातच हृदयावर गंभीरपरिणाम होऊन ते बंद होते, अशावेळी रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी ‘पामी’ (प्रायमरी अँजिओप्लास्टी इनमायोकार्डियल इनफारक्शन) ही सर्जरी करणे, हा वैद्यकीय जगतात खात्रीचा उपचार समजला जातो. हा एंजियोप्लास्टीचा प्रकार असून ज्यामध्ये रक्तवाहिन्याना (कोरोनरी धमन्या) पूर्ववत रक्त पुरवठा करण्यासाठी एक बलून व स्टेण्ट वापरला जातो. सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत तरूण वयामध्ये हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णाला ‘पामी’ या पद्धतीचा भरपूरफायदा होतो. हा उपचार त्वरित केल्यावर रुग्णांचा पुढील ९० मिनिटांतील मृत्यूचा धोका कमी होतो. हृदयविकाराची लक्षणे जाणवल्यावर दोनतासांत (गोल्डन अवर) त्याला रुग्णालयात पोहोचविणे अत्यंत आवश्यक असते. सरासरी ८३ टक्के रुग्ण रुग्णालयात वेळेवर पोहोचत नसल्यामुळे ते दगावत असल्याचे मुंबईच्या लोकमान्य टिळक रुग्णालयाच्या संशोधनात आढळून आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच रुग्णालयाचे केंद्र प्रमुख रवी हिरवाणी यांनी सांगितले कि, गेल्या काही दशकांमध्ये भारतात कोरोनरी आर्टरी रोग (सीएडी) म्हणजेच हृदयविकाराचा प्रादुर्भाव वाढला आहे. आपल्या जीवनशैलीत झालेल्या बदलामुळे स्थूलता, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधित असणारे आजार वाढीस लागले आहेत. वैद्यकीय संशोधनात अद्ययावत प्रगती झाल्याने ‘गोल्डन अवर’ मध्ये हृदयविकार रुग्णांना त्वरित उपचार उपलब्ध करून दिल्यास त्यांच्या मृत्यूची संख्या कमी करण्यास मदत होऊ शकते.