गरिबी दूर होऊन सर्वांना शिक्षण मिळायला हवे, सिग्नल शाळेतील मुलांचे विचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 03:34 AM2018-08-15T03:34:39+5:302018-08-15T03:35:31+5:30
भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले. आपल्या देशावर इंग्रजांचे राज्य होतं, बरं झालं ते निघून गेले आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. नाहीतर आज आपल्याला आपली मराठी भाषासुद्धा बोलता आली नसती.
- स्नेहा पावसकर
ठाणे : भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले. आपल्या देशावर इंग्रजांचे राज्य होतं, बरं झालं ते निघून गेले आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. नाहीतर आज आपल्याला आपली मराठी भाषासुद्धा बोलता आली नसती. आपल्या देशाचा आम्हाला अभिमान आहे; पण देशात खूप गरीबी आहे. प्रत्येकाला शिक्षण मिळत नाही. अस्वच्छता, धूम्रपान या प्रमुख समस्या आहेत. विचारांचे हे ‘स्वातंत्र्य’ पाहायला मिळाले ते सिग्नल शाळेतील अवघ्या १0 ते १२ वर्षे वयोगटातील मुलांनी व्यक्त केलेल्या निखळ भावनांमध्ये.
गेली अनेक वर्षे समाजातील सोयीसुविधांपासून दूर असलेली ही मुले ठाण्यातील तीनहातनाका येथे सुरू झालेल्या सिग्नल शाळेच्या माध्यमातून शिक्षणाच्या प्रवाहात आलीत. सिग्नलवर केवळ झेंडे विकणे आणि शक्य झाल्यास दूर उभे राहून एखादा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम पाहणे, इतकेच त्यांच्या नशिबी असायचे. आजही आम्ही झेंडे घेऊन येतो. ते सिग्नलवर विकतो; मात्र शाळा सुटल्यावर. झेंडा विकताना त्याचे व स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व आम्हाला माहित आहे. सिग्नल शाळेत प्रवेश घेतल्यापासून आम्ही आमच्या शाळेत आपला स्वातंत्र्य दिन साजरा करू लागलो आहोत. आम्ही झेंड्याला सलामी देतो, लेझीम खेळतो, ध्वजगीतासह स्वातंत्र्य दिनाची गाणी म्हणतो. त्यावेळी खूप आनंद होतो, असे सिग्नल शाळेतील मुले म्हणाली.
आज देशात अनेकांना राहायला स्वत:ची घर नाहीत. लोकं खूप गरीब आहेत. दिवसेंदिवस प्रदूषण वाढतयं. धूम्रपानची समस्या आहे. या समस्या संपल्या पाहिजे. आम्हाला शिक्षणाची सोय उपलब्ध झाली; पण आजही अनेक मुलांना शिक्षण मिळत नाही. त्यांच्या आईवडिलांनी मुलांना शिकविले पाहिजे. शिक्षण सगळ्यांसाठी महत्त्वाचे आहे. आम्हाला शिक्षण घ्यायला खूप आवडते. शिकून पुढे पोलीस, पायलट, इंजिनिअर व्हायचं आहे, अशी या चिमुकल्या डोळ्यांनी रंगवलेली स्वप्नेही सांगितली.
मोदींना ओळखतात; बाळासाहेब आवडीचे नेते
सिग्नल शाळेतील ही मुले केवळ अभ्यासातच नव्हे तर सामान्य ज्ञानातही हुशार आहेत. देशाचे पंतप्रधान कोण आहेत, असे विचारले असता, क्षणाचा विलंब न करता अनेकांनी नरेंद्र मोदी
असे तर महाराष्टÑाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत असे उत्तर दिले. बाळासाहेब ठाकरे, ठाण्यातले एकनाथ शिंदेही आम्हाला माहित आहेत आणि आवडतातही, असेही काही मुले यावेळी उत्तरलीत.
पैसे कमवायचे असतात ना...
स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिनी सिग्नलवर विकण्यासाठी आम्ही स्वत: आणि अनेकदा एकट्याने कुर्ला किंवा इतर ठिकाणच्या मार्केटमध्ये जाऊन झेंडे आणतो. आम्हाला ते कमी किमतीत मिळत असले तरी आम्ही २० रूपयाला विकतो. कारण त्यातून पैसे कमवायचे असतात ना... असे उत्तर निखळ मनाने एका मुलाने दिले.