सर्वांना लस मिळण्यासाठी वर्षभराची वाट पाहावी लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 12:10 AM2021-03-05T00:10:30+5:302021-03-05T00:10:39+5:30
लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू : कोविशिल्डचा दिला जात आहे डोस
सुरेश लोखंडे
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोनावर मात करण्यासाठी जिल्ह्यात ‘कोविशिल्ड’ या नावाची लस दिली जात आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यानंतर आता या लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत या लसीकरणाचा पहिला डोस ९३ हजार ८७६ जणांनी घेतला आहे. तर दुसरा डोस १६ हजार ७६८ जणांनी घेतल्याचे निदर्शनात आले आहे. याप्रमाणे लसीकरण सुरू राहिल्यास जिल्ह्यातील सर्वांना कोरोना लस मिळण्यासाठी वर्षभर वाट पाहावी लागणार असल्याचे ऐकायला मिळत आहे.
केंद्र शासनाच्या तांत्रिक समितीने कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी राज्यभरात कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन लसींना मान्यता दिली आहे. यापैकी जिल्ह्यात ‘कोविशिल्ड’ हा डोस दिला जात आहे. जिल्ह्यातील पहिल्या फळीतील आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात ‘कोविशिल्ड’ लस दिली जात आहे. याशिवाय दुसऱ्या फळीतील पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आदीं एक लाख ७५ हजार ४२२ जणांना ही लस देण्याचे नियोजन आहे.
केंद्रांवर सोयीसुविधांचा अभाव
nजिल्ह्यात पहिल्या दिवशीच ७३५ ज्येष्ठ नागरिकांनी ही लस घेतली. त्यांच्याकडून आता जिल्ह्यातील सर्वच केंद्रांवर गर्दी केली जात आहे.
nसोयीसुविधा व त्यांच्या बसण्यासाठी मात्र आवश्यक ती सुविधा जिल्ह्यात ठिकठिकाणी आढळून येत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
nमार्चच्या पहिल्या दिवसापासून ४५ ते ६० आणि ६० पेक्षा जास्त वयस्कांसाठी जिल्ह्यातील सर्वच्या सर्व म्हणजे २८ लसीकरण केंद्रांवर ही कोविशिल्ड नावाची लस दिली जात आहे.
nमात्र, ठिकठिकाणी नियोजनाचा फज्जा उडालेला आहे. ज्येष्ठांना ठिकठिकाणच्या केंद्रांवर उन्हातान्हात ताटकळत उभे राहावे लागत आहे.
जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या लसीकरणाचा मोठ्या प्रमाणात लाभ घेणे अपेक्षित आहे. त्यासाठी ठिकठिकाणी आरोग्य यंत्रणा तैनात आहे. याशिवाय ज्येष्ठांनीदेखील ठिकठिकाणच्या लसीकरण केंद्रांवर जाऊन या कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा लाभ घेणे अपेक्षित आहे. त्यांसाठीही यंत्रणा जिल्हाभर सज्ज आहे. - डॉ. मनीष रेंघे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. ठाणे