“मी जे काही बोलले तो माझा अधिकार”; केतकी चितळेनं कोर्टात स्वत: केला युक्तिवाद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 12:36 PM2022-05-15T12:36:41+5:302022-05-15T12:39:59+5:30
अभिनेत्री केतकी चितळेला(Ketaki Chitale) कोर्टात हजर केले तेव्हा तिने बचावासाठी वकील उभे केले नाहीत
ठाणे – अभिनेत्री केतकी चितळे हिने फेसबुकवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर वादग्रस्त पोस्ट लिहिली. या पोस्टनंतर राज्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. केतकी चितळेविरोधात विविध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शनिवारी पोलिसांनी केतकी चितळेला अटक केली होती. आज ठाण्यातील कोर्टात केतकीला हजर केले. तेव्हा कोर्टाने तिला १८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
कोर्टात नेमकं काय झालं?
अभिनेत्री केतकी चितळेला(Ketaki Chitale) कोर्टात हजर केले तेव्हा तिने बचावासाठी वकील उभे केले नाहीत. कोर्टात तिने स्वत:च युक्तिवाद केला. तुमची काही तक्रार आहे का असं कोर्टाने विचारताच ती नाही म्हणाली. तर तुमचे वकील कोणी आहेत का? या प्रश्नाला उत्तर देताना केतकी म्हणाली, नाही. मी जे काही बोलले तो माझा अधिकार आहे. मी जे काही पोस्ट केले तो माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. केतकीने तिची बाजू इंग्लिशमध्ये कोर्टात मांडली.
यावेळी कोर्टात ठाणे क्राईम ब्रांचने केतकीची कोठडी मागितली. केतकीनं केलेली पोस्ट तिने का केली? कुणाच्या सांगण्यावरून केली. या मागे कोण आहे याचा शोध घ्यायचा आहे असं सांगत तिच्या कोठडीची मागणी केली. त्यावर केतकी म्हणाली, मी कोणी राजकीय व्यक्ती नाहीये. राजकीय नेता नसून मी एक सामान्य व्यक्ती आहे. मी जी पोस्ट केली ती एक प्रतिक्रिया होती. हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा एक भाग आहे. मी काही मास लिडर नाहीये की माझ्या काही लिहिण्याने कायदा सुव्यवस्था निर्माण होईल असं तिने सांगितले.
ठाणे - शरद पवारांवर आक्षेपार्ह टीका करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेला १८ मे पर्यंत पोलीस कोठडी #ketkichitale#SharadPawarpic.twitter.com/Sb230Kp6nI
— Lokmat (@lokmat) May 15, 2022
नवी मुंबईच्या कळंबोली पोलीसांनी केतकी चितळेला शनिवारी ताब्यात घेतल्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकने तिला अटक केली. रविवारी सुट्टीच्या न्यायालयात ठाणे पोलीसांनी तिला हजर केले. यावेळी तिने न्यायालयात स्वत: युक्तीवाद केला. तिने आपली बाजू मांडण्यासाठी कोणत्याही वकिलाची नियुक्ती केली नाही. यावेळी केतकीने न्यायालयात आपली बाजू मांडताना , सोशल मिडियावर व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य नाही का? असा प्रश्न तिने उपस्थित केला. तिला न्यायालयात हजर करताना पोलीसांनी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.