ठेकेदाराला वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:27 AM2021-06-17T04:27:17+5:302021-06-17T04:27:17+5:30
ठाणे : कोरम मॉलजवळील परिसरात नाल्याच्या बांधकामासाठी रस्त्यावर खोदलेल्या खड्ड्यात पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आल्यानंतर ...
ठाणे : कोरम मॉलजवळील परिसरात नाल्याच्या बांधकामासाठी रस्त्यावर खोदलेल्या खड्ड्यात पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आल्यानंतर अपघाताच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मार्गरोधक उभारले असल्याचा दावा करून काही अधिकाऱ्यांकडून संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या बचावासाठी प्रयत्न सुरू होते; परंतु या अधिकाऱ्यांची महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा आणि अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांनी कानउघाडणी केली.
अपघाताच्या ठिकाणी मार्गरोधक नसल्याचे पोलीस तपासात समोर आले, तर त्यांच्यासोबत तुम्हालाही सहआरोपी करण्यात येईल. एका व्यक्तीचा जीव गेला आहे. त्यामुळे निष्काळीपणा करणाऱ्यांना वाचवू नका, असे खडेबोल संबंधित अधिकाऱ्यांना सुनावले; परंतु या प्रकरणात कनिष्ठ अभियंत्यावर कारवाई करताना वरिष्ठ अधिकाऱ्याला मात्र पाठीशी घातले जात असल्याची चर्चा झाली आहे.
संभाजीनगर भागात कोरम मॉलजवळील नाल्याच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून प्रसाद देऊळकर (३५) या दुचाकीस्वाराचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. यात संबंधित कंत्राटदाराविरोधात वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेनंतर महापालिकेच्या कारभारावरही टीका झाली. या पार्श्वभूमीवर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांनी एक सदस्यीय समिती स्थापन करून त्यांना ४८ तासांत चौकशी अहवाल आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याकडे सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अतिरिक्त नगर अभियंता अर्जुन अहिरे यांनी हा अहवाल तयार करून तो आयुक्तांकडे मंगळवारी सायंकाळी सादर केला. त्यामध्ये नाले बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून प्रतिबंधात्मक स्वरूपाची कोणतीही उपाययोजना संबंधित ठेकेदाराने केली आहे किंवा नाही याची खातरजमा महापालिकेचे कनिष्ठ अभियंता विजय लोकरे यांनी करणे गरजेचे होते; परंतु त्यांनी तसे न केल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. दुसरीकडे बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून प्रतिबंधात्मक स्वरूपाची कोणतीही उपाययोजना केलेली नसल्याचे पाहणी दौऱ्यातून समोर येताच देशमुख यांनी मे. पायोनिअर वॉटरफ्रूप कोटिंग या कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामध्ये कंत्राट रद्द करून हे काम अन्य ठेकेदारांकडून तुमच्या जोखमीवर, तसेच खर्चातून करून घेऊन तुम्हाला काळ्या यादीत का टाकू नये, अशी विचारणा केली आहे. याबाबतचे स्पष्टीकरण हे पत्र मिळाल्यापासून पुढील ४८ तासांत नगर अभियंत्यांकडे देण्याचा आदेश त्यांनी दिला आहे.
दुसरीकडे हा अपघात घडल्यानंतर सदर ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मार्गरोधक उभारल्याचे सांगून त्यातून बचाव करण्याचा प्रयत्न करून ठेकेदाराला वाचविण्याचे प्रयत्न काही अधिकाऱ्यांनी केले होते. ही बाब आयुक्तांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी संबंधितांचे कान उपटून अपघाताच्या ठिकाणी मार्गरोधक नसल्याचे पोलीस तपासात समोर आले, तर त्यांच्यासोबत तुम्हालाही सहआरोपी करण्यात येईल. या अपघातात एका व्यक्तीचा जीव गेला आहे. त्यामुळे निष्काळीपणा करणाऱ्यांना वाचवू नका, असे खडेबोल सुनावले असल्याचे समजते.