फी न भरल्याने परीक्षा पोर्टल ‘ऑफ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 12:50 AM2020-10-06T00:50:36+5:302020-10-06T00:50:44+5:30
कल्याणमधील शाळेचा प्रताप; विद्यार्थी, पालकांना मनस्ताप
कल्याण : पश्चिमेतील पोदार इंग्रजी शाळेने आॅनलाइन परीक्षेचे पोर्टल ‘आॅफ’ केले आहे. लॉगीन केल्यावर आधी फी भरा, असा मेसेज येत असल्याने विद्यार्थी व पालक त्रस्त झाले आहेत. परिणामी, विद्यार्थी परीक्षा देऊ शकत नसल्याने शाळा व्यवस्थापनाला जाब विचारण्यासाठी संतप्त पालक शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ जमले होते. मात्र, मुख्याध्यापक न भेटल्याने पालकांच्या पदरी निराशा आली आहे. पालक आपल्या पाल्यांच्या परीक्षेबाबत चिंतित आहेत.
पालक मनीष वैद्य म्हणाले, यंदा कोरोनामुळे शाळा सुरू न झाल्याने विद्यार्थी शाळेच्या पोर्टलद्वारे आॅनलाइन शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांनी सोमवारी परीक्षेसाठी पोर्टलवर लॉगीन केले असता त्यांना त्यावर आधी फी भरा, असा मेसेज येत होता. पोर्टल ओपन न झाल्याने विद्यार्थ्यांना आॅनलाइन परीक्षा देता आलेली नाही. एका विद्यार्थ्याची फी वर्षाला ७२ हजार रुपये आहे. ही फी पहिल्या दोन टप्प्यांत प्रत्येकी २५ हजार व शेवटच्या टप्प्यात २० हजार रुपये, अशी भरली जाते. मात्र, यंदा शाळा सुरू झाल्याशिवाय शाळांनी फी घेऊ नये, फीसाठी पालकांकडे शाळांनी तगादाही लावू नये, असे शिक्षण खात्याचे आदेश आहेत. असे असतानाही शाळा पालकांकडे विद्यार्थ्यांची फी मागत आहे.
ते पुढे म्हणाले, ‘यंदा विद्यार्थ्यांच्या आॅनलाइन शिक्षणासाठी पालकांनी टॅब, लॅपटॉप, वायफाय घेतले आहे. आॅनलाइन शिक्षणामुळे शाळेला काही खर्च झालेला नाही. दुसरीकडे अनेक पालकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. लॉकडाऊनमुळे हाती पैसा नसल्याने शाळेने फीमध्ये ५० टक्के सूट द्यावी, अशी पालकांची मागणी आहे. मात्र, त्याला शाळा व्यवस्थापन दाद देत नाही.’
शाळा व्यवस्थापनाकडून कोणताही प्रतिसाद नाही; आजच्या बैठकीत निघणार तोडगा?
कल्याण : पोदार शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ पालक सोमवारी जमले होते. तेथे शाळेतील व्यवस्थापन पाहणारे अमित यांनी पालकांशी बोलणे पसंत केले नाही. शाळेच्या लॅण्डलाइन फोनवर फोन केल्यास कोणीही उचलत नाही. शाळेच्या मुख्याध्यापिका क्षेमा मोहन याही कोणताच प्रतिसाद देत नाहीत. पत्रकारांनीही शाळा व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही प्रतिक्रिया उपलब्ध झाली नाही.
त्यामुळे पालकांनी अखेरीस स्थानिक शिवसेना नगरसेवक सुनील वायले यांच्याशी संपर्क साधला. पालक समिती व शाळा व्यवस्थापन यांची मंगळवारी बैठक होणार असून, त्यात पालकांच्या मागणीवर चर्चा होणार आहे. त्यातून काही तोडगा काढला जाईल, असे त्यांनी पालकांना आश्वासित केले आहे.