परीक्षा हव्यात; ढकलपास नकोच

By Admin | Published: August 28, 2015 12:15 AM2015-08-28T00:15:09+5:302015-08-28T00:15:09+5:30

शालेय विद्यार्थ्यांच्या बालमनावर होणारा अभ्यासाचा ताण कमी करून आत्महत्या रोखण्यासाठी केंद्र सरकारतर्फे इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत परीक्षा नकोत असा निर्णय घेण्यात आला.

Examination seeks; Do not skip over | परीक्षा हव्यात; ढकलपास नकोच

परीक्षा हव्यात; ढकलपास नकोच

googlenewsNext

- जान्हवी मोर्ये,  ठाणे
शालेय विद्यार्थ्यांच्या बालमनावर होणारा अभ्यासाचा ताण कमी करून आत्महत्या रोखण्यासाठी केंद्र सरकारतर्फे इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत परीक्षा नकोत असा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सगळेच विद्यार्थी पुढच्या वर्गात जातात. ढकलपासमुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागत नसून तो तिला मारक ठरत असल्याच्या प्रतिक्रिया शालेय मुख्याध्यापक, पालक आणि विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या मते परीक्षाच योग्य आहेत. त्यातून खरा विकास साधला जाऊ शकतो. त्यामुळे केंद्र सरकारने ढकलपासचा पुनर्विचार करावा असाही आग्रह संबंधित घटकांनी धरला आहे.
डोंबिवलीतील चरु बामा म्हात्रे स्कूलचे मुख्याध्यापक गजानन भोसले यांच्यामते, परीक्षा नसल्याने विद्यार्थ्यांचे मूल्यमापनच होत नाही. ती घेतली जात नसल्याचा मेसेज पालकांमध्ये असला तरी शिक्षक त्यांच्या पातळीवर परीक्षा घेत असतात. इयत्ता चौथीनंतर पाचवीला त्यांच्यात परीक्षा न घेऊन सुद्धा त्यांचा भाषिक व गणिती विकास किती झाला. याची पायाभूत चाचणी घेतली जाणार आहे. त्यातून मुलांना आधीच्या इयत्तेत (चौथीत) शिकविलेले कितपत आठवते. याची चाचपणी केली जाते. शिक्षकांसोबत पालकांवरही काही जबाबदारी हवी. परीक्षा नसल्याने आज शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील शाळांमधून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वाचता येत नाही. ही वस्तुस्थिती आहे. ती नाकारु न चालणार नाही. विद्यार्थ्यांचे वाचन कमी झाले आहे. विद्यार्थ्यांचा कल शालेय वयातच शिक्षणाच्या माध्यमातून तपासला गेला पाहिजे. त्यामुळे त्यांना करिअर निवडीचा प्रश्न भेडसावणार नाही. मात्र आपल्याकडील शैक्षणिक धोरण ठरविताना शिक्षण तज्ज्ञांना विचारात घेतले जात असले तरी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना विचारात घेतले जात नाही ते घेण्याची गरज आहे.
कल्याणच्या बापूराव आघारकर या शाळेच्या मुख्याध्यापिका कमालिनी जीवतोडे यांनी यासंदर्भात सांगितले की, पहिली ते आठवीपर्यंत परीक्षा नको हा निर्णय बदलण्याची गरज आहे. ती नसेल तर पालकांचे दुर्लक्ष होते. ते त्यांच्या पाल्याकडे लक्ष देत नाहीत. कारण मुलगा पासच होणार आहे. कशाला त्याचा अभ्यास घ्या, त्याला कुठे आहे परीक्षा. प्रत्यक्षात ढकलपास होत गेलेला विद्यार्थी हा नववीच्या वर्गात गेल्यावर त्याला नीट वाचता येत नाही. ही बाब प्रकर्षाने सामोरी आली आहे. विद्यार्थ्यांचे अंगभूत कलागुण जाणून न घेता त्यांना पास केले जात असल्याने ही मुले त्यात मागे पडतात. तसेच नववीला थेट परीक्षेला सामोरे जावे लागते. त्यांची परीक्षेची सवय मोडलेली असते. त्यामुळे थेट नववीत परीक्षेस सामोरे गेल्यावर त्यांच्या मनात ती विषयी अकारण भीती निर्माण होेते. कारण त्यांची लेखन क्षमता विकसीत झालेली नसते.
मुख्याध्यापक चंद्रकांत पवार यांनी सांगितले की, ढकलपासच्या निर्णयात बदल होणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय रद्द करावा. विद्यार्थ्यांना परीक्षा हवी. त्यांच्या आवडीनुसार शिक्षण मिळावे. एखाद्या विद्यार्थ्यांला ७२ टक्के आणि एखाद्याला ७८ टक्के गुण मिळाले. तर दोघांची श्रेणी एकच होते. टक्केवारी असावी. त्यामुळे त्यांच्यातील फरक कळतो. परीक्षाच नसल्याने शालेय वातावरणात एक प्रकारची मरगळ आली आहे. ती शैक्षणिक गुणवत्ता वाढीस मारक आहे. शालेय विद्यार्थी नापास झाल्यावर आत्महत्या करीत होते हे समजणे चुकीचे आहे. त्यामुळे परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला. वास्तविक पाहता एखाद दोन आत्महत्या दुर्दैवाने झाले असतील परंतु त्याचा बाऊ केला गेला. त्यातून हा चुकीचा निर्णय घेतला गेला. त्यात बदल होणे अपेक्षित आहे.
नेहा कदम ही आघारकर शाळेत इयत्ता सातवीच्या वर्गात शिकते. तिच्या पालकांनी सांगितले की, परीक्षाच योग्य आहे. दर वर्षी त्या झाल्या पाहिजेत. त्यातून पाल्याची प्रगती कळते. ढकलपासचा निर्णय बदलण्याची नितांत गरज आहे. श्रेणीतून टक्केवारी कळत नाही. टक्केवारीतून कोणत्या विषयात किती प्रगती झाली याचा अंदाज येत नाही. ढकलपास सुरू ठेवली तर पुढील शिक्षण बंद होण्याची भीती आहे. ढकलपासमुळे गुणवत्तेवर परिणाम होतो. काही मुलांनी आत्महत्या केलेल्या असल्या तरी त्या प्रत्येका मागे ओव्हरलोडेड अभ्यास हेच कारण असेल असे नाही. इतरही सामाजिक कारणे आहेत. त्यांचा विचार होण्याची गरज आहे.
नेहा यांची मुलगी प्रिया हिने सांगितले की, परीक्षा हवी. कारण त्यातून प्रगती कळते. आपले कुठे चुकले आहे. आपण कोणत्या विषयात कमी पडलो. कोणत्या विषयात चांगले आहे. याचा आलेख कळतो. टक्केवारीतून ध्येय ठरविता येते. ढकलपास मधून तसा परिणाम साधत नाही.

परीक्षेची सवय नसल्यास पुढील आयुष्य कठीण
पालक साक्षी साठे यांच्या मते, परीक्षेमुळे मुले काय शिकतात. ते कळते. एखाद्या विषयात ती मागे पडली तर त्यावर मेहनत घेऊन त्याची तयारी करु न घेता येते. ढकल पासचा निर्णय चुकीचा आहे. तो बदलल्याशिवाय शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागणार नाही. अभ्यास हा झालाच पाहिजे. परीक्षेची सवय नसल्यास आयुष्यातील इतर परिक्षांनाही ही मुले सामोरी जाणार नाही. ढकलपासमुळे कमकुवत पिढी तयार होईल अशी भीती साठे यांनी व्यक्त केली आहे.
त्यांच्या दोन्ही मुले आयुष व प्राजक्ता हे शाळेत जातात. आयुष हा सहावीला तर प्राजक्ता ही चौथीला आहे. या दोघांचे म्हणणे आहे की, परीक्षा हवी. ती असेल तर टेन्शन येते. पण अभ्यासही केला जातो. तिची नाहक भीती नको असावी चांगल्या उद्देशाकरीता. परीक्षाच नसल्याने आम्ही काहीच अभ्यास करणार नाही. टक्केवारी असावी. श्रेणीतून आपण कोठे आहोत. हे नक्की कळत नाही.

Web Title: Examination seeks; Do not skip over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.