उल्हासनगरात खोदलेले रस्ते धुळीने माखले, पाणी फवारणी नावालाच, रस्ते दुरुस्ती कधी?
By सदानंद नाईक | Published: January 5, 2024 07:00 PM2024-01-05T19:00:36+5:302024-01-05T19:01:32+5:30
सर्वसामान्य नागरिकांना पडला प्रश्न
सदानंद नाईक, उल्हासनगर: शहरात भुयारी गटारीचे पाईप टाकण्यासाठी खोदलेले रस्ते वेळीच दुरुस्त केले नसल्याने रस्ते धुळीने माखले आहे. धुळीचा त्रास कमी करण्यासाठी पाण्याची फवारणी नावालाच केली जात असून रस्ता बांधणी कधी? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
उल्हासनगरात ४२३ कोटीच्या भुयारी गटार योजनेला मंजुरी मिळाली असून गटारीचे पाईप टाकण्याचे काम सुरू झाले आहे. एमएमआरडीएने १५० कोटीच्या निधीतून एकून ७ रस्ता बांधणीला मंजुरी दिली असून हे रस्ते बांधण्यापूर्वी रस्त्यात भुयारी गटारी टाकण्यात येत आहे. मात्र खोदलेले रस्ते तात्पुरते बुजविल्याने रस्ते धुळीने माखले आहे. धुळीमुळे नागरिक हैराण झाल्याने, महापालिका यंत्राद्वारे पाणी फवारणी करीत आहे. मात्र ते पुरेशी नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. धुळीने शहरातील हवेच्या प्रदूषणात वाढ झाली आहे. रस्ता बांधणी पर्यंत नागरिकांनी श्वासातून धूळ घ्यायची काय? असा संतप्त प्रश्न नागरिक करीत आहेत.
शहरातील भुयारी गटार योजने अंतर्गत गटारी पाईप टाकण्यासाठी खोदलेले रस्ते संबंधीत ठेकेदाराने त्वरित पक्के दुरुस्ती करण्याची अट आहे. अशी अट असताना खोदलेले रस्ते दुरुस्त का केली जात नाही? असा प्रश्न नागरिकासह राजकीय पक्षाचे नेते विचारीत आहेत. एमएमआरडीएने मंजुरी दिलेल्या ७ रस्त्याचे बांधकाम सुरु होण्यापूर्वी रस्ता खोदून गटारी पाईप टाकण्याचे काम सुरू झाले. मात्र गटारीचे पाईप टाकण्याचे काम २ ते ३ महिन्यांपूर्वी होऊनही रस्त्याच्या बांधणीला सुरवात झाली नाही. अथवा खोदलेले रस्ते संबंधित ठेकेदाराने दुरुस्त केले नाही. महापालिका बांधकाम विभाग व पाणी पुरवठा विभाग अधिकारी संबंधित ठेकेदारांचे रस्ता दुरुस्तीचे पैसे वाचविण्यासाठी त्याला पाठीशी घालत असल्याचा आरोप बीएसपीचे प्रदेश महासचिव प्रा. प्रशांत इंगळे यांनी केला आहे.
रस्ता दुरुस्तीचे आदेश- आयुक्त अजीज शेख
शहरात काही रस्ते खोदून भुयारी गटारी पाईप टाकण्याचे काम सुरू असून खोदलेले रस्ते धुळीने माखले आहे. मात्र खोदलेले रस्ते दुरुस्ती करण्याचे आदेश बांधकाम विभागाला दिले आहे.
संदीप जाधव (शहर अभियंता- महापालिका)
एमएमआरडीएने मंजूर केलेल्या रस्ताची बांधण्यापूर्वी भुयारी गटारीचे पाईप टाकण्याचे काम सुरू आहे. खोलेले रस्ते तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्त केले असून लवकरच रस्ता बांधणीला सुरवात होणार आहे. त्यामुळे धुळीचा प्रश्न निकाली लागणार आहे.