भिवंडी-वाडा महामार्गावर खोदकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 12:30 AM2020-07-30T00:30:29+5:302020-07-30T00:30:35+5:30
माती रस्त्यावर येऊ न चिखल : गाड्या स्लीप होऊन अपघात होण्याची भीत
वाडा : भिवंडी तालुक्यातील अंबाडी, खरिवली व वाडा तालुक्यातील घोणसई येथे २२/२२ व ३३ केव्हीएम वीजउपकेंद्राचे काम सुरू असून या केंद्रासाठी तालुक्यातील भावेघर या केंद्रातून वीज पुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी भिवंडी वाडा महामार्गालगत वीजवाहिनी खोदाईचे काम संबंधित ठेकेदाराने भर पावसाळ्यात सुरू केले आहे. या कामामुळे खोदकामामुळे माती रस्त्यावर पडून पावसामुळे इतरत्र पसरून चिखलाचे साम्राज्य पसरते. त्यामुळे हे काम तत्काळ बंद करावे, अशी मागणी प्रवासी करत आहेत.
अंबाडी, खिरवली व घोणसई येथे २२/२२ व ३३ या क्षमतेच्या वीजउपकेंद्राचे काम सुरू असून या वीज केंद्रासाठी भावेघर येथील वीजकेंद्रातून विजेचा पुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी अंबाडी ते भावेघर या अंतरापर्यंत जमिनीखालून वीजवाहिनी टाकण्याचे काम लीना पॉवर या कंपनीने सुरू केले आहे. पावसाळ्यात रस्त्याच्या बाजूला खोदकाम करू नये, असा नियम असताना संबंधित कंपनीने नियम धाब्यावर बसवून भर पावसाळ्यात वाहिनी खोदाईचे काम सुरू केले आहे. त्यामुळे खोदकाम केलेली माती ही रस्त्यावर पडून पावसात चिखल झाल्याने दुचाकी स्लीप होऊ न अपघात होत आहेत. काही दुचाकीस्वार गाडी स्लीप होऊन पडले आहेत. मात्र त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.
खोदकाम करताना कंपनीने रस्त्याच्या मध्यापासून १५ मीटर अंतरावर खोदकाम करण्याचा नियम आहे. हा नियम पायदळी तुडवून कंपनीने १५ मीटरच्या आत रस्त्यावरच खोदकाम केले जात असल्याचा आरोप प्रवाशी करीत आहेत. वीजवाहिनीचे काम पावसाळ्यात थांबवून ते पावसानंतर करावे, अशी मागणी या रस्त्यावरून येणारे जाणारे प्रवासी करत आहेत.
नियम डावलून काम
वीज वाहिनीची खोदाई १.२० मीटर खोल अंतरापर्यत करण्याचा शासनाचा नियम आहे. मात्र कंपनीने हा नियमही पायदळी तुडवून कमी खोदाई करीत आहे. खोदकाम केल्यानंतर खाली वाळू टाकून नंतर वाहिनी मग त्यावर कव्हर टाकले जाते. यासंदर्भात लीना पॉवरचे अधिकारी स्वप्नील मैड यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने ठरवून दिलेल्या जागेवरच काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
वीजवाहिनीसाठी रस्त्यावर सुरू केलेले खोदकाम तत्काळ थांबवण्यात यावेत अशा प्रकारचे आदेश संबंधित कंपनीला देण्यात आले आहेत. तत्काळ काम न थांबवल्यास कारवाई करण्यात येईल.
- ए. एम. बरसट,
शाखा अभियंता
सार्वजनिक बांधकाम विभाग, वाडा.