पावसाळ्याच्या तोंडावर खोदकाम

By admin | Published: June 2, 2017 05:28 AM2017-06-02T05:28:01+5:302017-06-02T05:28:01+5:30

१५ मेनंतर खोदकाम करू नये तसेच ३१ मेपर्यंत डांबरीकरणाची कामे पूर्ण करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले असताना पावसाळ्याच्या

Excavation in the mouth of the monsoon | पावसाळ्याच्या तोंडावर खोदकाम

पावसाळ्याच्या तोंडावर खोदकाम

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : १५ मेनंतर खोदकाम करू नये तसेच ३१ मेपर्यंत डांबरीकरणाची कामे पूर्ण करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले असताना पावसाळ्याच्या तोंडावर मीरा-भार्इंदरमध्ये अद्यापही खोदकामे सुरूच आहेत. डांबरीकरणही घाईगडबडीत सुरू असून पावसात टिकणार नसले, तरी ठेकेदारांचे खिसे मात्र भरणार आहेत.
पावसाळ्यात किंवा त्याआधी १५ दिवस केलेले डांबरीकरण टिकत नसल्याने राज्य शासनाने मेदरम्यानच डांबरीकरणाची कामे पूर्ण करण्याचे आदेश परिपत्रकाद्वारे दिलेले आहेत. पाण्यामुळे डांबर टिकत नसल्याने केलेला खर्च पाण्यात जातोच, शिवाय काम पुन्हा करावे लागत असल्याने खर्च वाढतो. डांबर उखडल्याने सर्वसामान्य नागरिक व वाहनचालकांना संपूर्ण पावसाळ्यात त्रास सहन करावा लागतो. आता सुरू असलेल्या कामाची परिस्थिती लक्षात घेता मीरा-भार्इंदरकरांची वाहने पावसाळ्यात उखडलेल्या खड्ड्यात जाऊ शकतात, अशी भीती व्यक्त होत आहे.
मीरा-भार्इंदर महापालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांनीदेखील आपत्कालीन आढावा बैठकीत १५ मेनंतर खड्डे खणण्यास परवानगी देऊ नये तसेच ३१ मेपर्यंत डांबरीकरणाची कामे पूर्ण करा, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागास व संबंधितांना दिले होते.
पावसाळा तोंडावर आला असताना शहरात सर्रास रस्तेखोदाई सुरूच असून खोदकाम केलेले रस्ते अजूनही डांबरीकरणाअभावी रखडले आहेत. खोदकाम केल्यावर रस्ते दगडमातीने भरल्यावर लगेच खडी व डांबर टाकता येत नाही. खड्ड्यांतील माती चांगली खाली बसावी लागते. आधीच डांबरीकरण केल्यास रस्ता खचतो आणि पाण्यामुळे डांबर टिकत नाही, असा अनुभव आहे.
ज्या ठिकाणी खडीकरण केले आहे, तेथेदेखील आता डांबरीकरण केल्यास ते टिकणार नाही. परंतु, या सर्व बाबींची कल्पना व आयुक्तांचे आदेश असतानासुद्धा पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील अनागोंदी व गैरकारभारामुळे सर्रास खोदकामे सुरू आहेत.
चांगले रस्तेदेखील पावसाआधी खोदले जात असल्याने पावसाळ्यात लोकांना नाहक जाच होणार आहे. अर्धवट राहिलेले काही रस्ते ढिसाळपणामुळे केवळ खडीकरण करून ठेवल्यानेदेखील पावसाळ्यात स्थिती बिकट होणार आहे.
या सर्व कामांवर काटेकोर देखरेख ठेवण्यासह डांबर व कामाचा दर्जा याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. पालिका निवडणूकसुद्धा तोंडावर असल्याने जो तो आपापल्या प्रभागातील कामे उरकण्यासाठी आग्रही असल्याचे दिसते.

काम टिकणार का?

पालिकेच्या भोंगळ व ठेकेदारधार्जिण्या कारभारामुळे पावसाळ्यात आता केलेले डांबरीकरण टिकणार का, याबद्दल साशंकता आहेच. शिवाय, खोदकामाच्या ठिकाणी रस्ते खचण्याची भीती निर्माण झाली आहे.
पालिकेच्या अधिकाऱ्यांनी वेळीच कामे पूर्ण न केल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. याप्रकरणी शहर अभियंता शिवाजी बारकुंड व कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांच्याशी पालिकेच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही.

प्रशासनाच्या मनमानी व भ्रष्ट कारभाराला सत्ताधाऱ्यांची साथ असल्याने कामांचा दर्जा न राखता केवळ खिसेभरू वृत्तीने कामे उरकली जात आहेत. यामुळे शहरवासीयांच्या पैशांचा दुरुपयोग होऊन पावसाळ्यात लोकांचे हाल होणार आहेत.
-प्रमोद सामंत, नगरसेवक

१५ मेनंतर खोदकामास परवानगी देऊ नये व ३१ मेपर्यंत डांबरीकरणाची कामे पूर्ण करण्याच्या आयुक्तांच्या आदेशांचे पालन केले जात आहे. पाणीपुरवठा, भूमिगत गटार योजनेदरम्यान पडलेले खड्डे प्राधान्याने बुजवायला घेतले आहेत.
-नितीन मुकणे, उपअभियंता, बांधकाम विभाग

Web Title: Excavation in the mouth of the monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.