सिंधी संस्कृतीचा पाया असलेल्या सिंधी शाळा उल्हासनगरमधून हद्दपार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 11:22 PM2020-02-23T23:22:08+5:302020-02-23T23:22:16+5:30

सिंधी संस्कृतीचा पाया असलेल्या सिंधी माध्यमाच्या शाळेकडे त्यांचे लक्ष न गेल्यामुळे सिंधी शाळा डळमळीत झाल्या.

Excerpt from Ulhasnagar, a Sindhi school with a foundation of Sindhi culture? | सिंधी संस्कृतीचा पाया असलेल्या सिंधी शाळा उल्हासनगरमधून हद्दपार ?

सिंधी संस्कृतीचा पाया असलेल्या सिंधी शाळा उल्हासनगरमधून हद्दपार ?

Next

- सदानंद नाईक , उल्हासनगर

देशाच्या फाळणीनंतर विस्थापित झालेल्या ९६ हजार सिंधी बांधवांना कल्याण शहराजवळील ब्रिटिशकालीन लष्करी छावणीतील बॅरेक आणि खुल्या जागेत वसवण्यात आले. घरदार, पैसा, जमीन, नातेवाइक सोडून आलेल्या सिंधी बांधवांसमोर जगण्या-मरण्याचा प्रश्न उभा ठाकला होता. केंद्र शासनाने दिलेल्या सवलीतीच्या बळावर सुरुवातीला छोटे-मोठे धंदे सुरू करणाऱ्या सिंधी बांधवांनी विविध क्षेत्रांत ठसा उमटवला. सिंधी समाजाची संस्कृती टिकवण्यासाठी सिंधू सर्कलसह अनेक संस्था नावारूपाला आल्या. तसेच मुलांचे शिक्षण सिंधी माध्यमातून होण्यासाठी शैक्षणिक संस्थेची स्थापना करून शासनाप्रमाणे सिंधी शाळा सुरू केल्या. कालांतराने इंग्रजी भाषेचे आकर्षण वाढल्याने सिंधी समाजासह इतर समाजाच्या मुलांचा कल इंग्रजी माध्यमाकडे झुकला. यामुळे सिंधी माध्यमाच्या शाळांला घरघर लागली. सिंधी संस्कृती टिकवण्यासाठी शहरातील नामांकित आणि सर्वसामान्य सिंधी बांधव एकत्र येऊ न चेटीचांद महायात्रा सुरू केली. मात्र, सिंधी संस्कृतीचा पाया असलेल्या सिंधी माध्यमाच्या शाळेकडे त्यांचे लक्ष न गेल्यामुळे सिंधी शाळा डळमळीत झाल्या.

शहराच्या स्थापना कालावधीत सर्वाधिक सिंधी माध्यमाच्या शाळा सुरू झाल्या. मात्र, या शाळा आता पटसंख्येअभावी एकापाठोपाठ बंद होत आहेत. पालिका शिक्षण मंडळाने सुरुवातीला ११ सिंधी माध्यमाच्या, तर सिंधी समाजाने सुरू केलेल्या शैक्षणिक संस्थेच्या अनेक शाळा होत्या. शाळेत हजारो सिंधी मुले शिक्षण घेत होते.

महापालिकेने रखडत सुरू ठेवलेल्या दोन सिंधी माध्यमाच्या शाळा गेल्या वर्षी मुलांच्या संख्येअभावी बंद केल्या. तीच परिस्थिती इतर खाजगी शैक्षणिक संस्थांवर ओढवली आहे. झुलेलाल शाळेत सिंधी माध्यमाची इयत्ता सातवीची शेवटची तुकडी आहे. एका महिन्यात मुलांची परीक्षा संपल्यावर सिंधी माध्यमाची शाळा बंद करण्यात येईल. कॅम्प नं. ५ परिसरात सिंधी समाजाने सिंधीसह इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली. या शाळेत इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत केवळ १०० मुले शिक्षण घेत आहेत. तीही शाळा मुलांच्या संख्येअभावी केव्हाही बंद पडण्याची शक्यता आहे.

शहरातील एकमेव स्वाती शांतीप्रकाश ही सिंधी माध्यमाची शाळा बंद झाली तर सिंधी समाजाची सिंधी लिपी व भाषा कालांतराने लोप पावेल, अशी भीती समाजातील मान्यवर व्यक्त करत आहेत. सिंधी माध्यमाच्या शाळा जिवंत राहण्यासाठी एकही नेता व समाजसेवक पुढे येत नसल्याची खंत सिंधी नागरिक व्यक्त करत आहेत. सिंधी लिपी आणि संस्कृती लुप्त होण्यापासून वाचवण्यासाठी सिंधी मुलांना सिंधी हा विषय सक्तीचा करावा, असे म्हणण्याचे धाडसही सिंधी समाजाकडे नाही.

देशभरात व राज्यात किती सिंधी माध्यमाच्या शाळा सुरू आहेत, याबाबत माहिती नाही. देशात सर्वाधिक सिंधी समाज ज्या ठिकाणी वसला आहे, त्या उल्हासनगरमधून सिंधी शाळा हद्दपार होण्याच्या मार्गावर आहेत.

सिंधी संस्कृतीचे शहर म्हणून उल्हासनगरकडे पाहिले जाते. मात्र, या शहरातून सिंधी माध्यमाच्या शाळा हद्दपार होण्याची वेळ आली आहे. सिंधी माध्यमाची शेवटी शाळा म्हणून स्वामी शांतीप्रकाश शाळेकडे बघितले जात आहे. झुलेलाल शाळेत इयत्ता सातवीची तुकडी यावर्षी अखेरची ठरणार आहे. पटसंख्येअभावी ही शाळा बंद करण्याचा निर्णय शाळा प्रशासनाला घ्यावा लागला आहे.

हा तर सिंधी संस्कृतीवर घाला
सिंधी माध्यमाच्या शाळा बंद होणे म्हणजे सिंधी संस्कृतीवर घाला असल्याचे मत सिंधी समाजातील मान्यवरांनी व्यक्त केले. सिंधी समाजाच्या विकासासाठी अनेक संस्था चालवल्या जातात, तर काही संस्था सिंधी संस्कृती, जुनी पुस्तके टिकवण्यासाठी पराकाष्टा करत आहेत. सिंधी माध्यमाची पुस्तके वाचण्यासाठी सिंधी समाजाकडे वेळ नसल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली. सिंधी माध्यमाच्या शाळा बंद होणे म्हणजे सिंधी संस्कृतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे असल्याचे मत व्यक्त होऊ लागले आहे.

सिंधी समाजाचे सर्वच क्षेत्रांत वर्चस्व
सिंधी समाजाने कमी वेळात चित्रपट, बिल्डर, व्यावसायिक, कपडा मार्केट, शेअर बाजार, कारखाने आदी अनेक क्षेत्रांत भरारी घेतली. ज्याप्रमाणे विविध क्षेत्रांत भरारी घेतली, त्या प्रमाणात सिंधी संस्कृती जिवंत ठेवण्यात काम केले नाही. त्यामुळेच सिंधी माध्यमाच्या शाळा बंद पडल्या आहेत. सिंधी भाषा, लिपी कालांतराच्या ओघात इतिहासजमा होण्याच्या मार्गावर असल्याचे अनेकांनी आपल्या मनातील खंत व्यक्त केली. सिंधी संस्कृतीची ओळख पुसली जाणार का? असा प्रश्न सिंधी समाजासमोर उभा ठाकला. यातूनही कालांतराने मार्ग निघण्याची आशा अनेकांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Excerpt from Ulhasnagar, a Sindhi school with a foundation of Sindhi culture?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा