गुन्हेगारी रोखण्यासाठी आरोपींचे ‘आदान-प्रदान’; आरोपींवर येणार दडपण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 12:03 AM2020-03-14T00:03:11+5:302020-03-14T00:03:22+5:30
अप्पर पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात प्रत्येक शनिवारी गुन्हेगार आदान-प्रदान संकल्पना राबविण्यास अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रेय कराळे यांनी जानेवारी महिन्यापासून सुरुवात केली आहे
सचिन सागरे
कल्याण : आरोपींवर मानसिक दबाव ठेवणे, तसेच त्यांची माहिती सर्व पोलीस ठाण्यांना व्हावी, याकरिता आरोपी आदान-प्रदान योजना अप्पर पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात सुरू करण्यात आली आहे.
अप्पर पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात प्रत्येक शनिवारी गुन्हेगार आदान-प्रदान संकल्पना राबविण्यास अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रेय कराळे यांनी जानेवारी महिन्यापासून सुरुवात केली आहे. परिमंडळ ३ आणि परिमंडळ ४ अंतर्गत १६ पोलीस ठाणी येतात. या परिमंडळात असलेल्या चार सहायक पोलीस आयुक्त कार्यालयांत महिन्याच्या प्रत्येक शनिवारी त्यांच्या विभागातील आरोपींना नेले जाते. तिथे उपस्थित असलेल्या पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी-कर्मचारी यांना सहायक पोलीस आयुक्त संबंधित आरोपींच्या माहितीचे आदान-प्रदान करतात. उघडकीस न आलेल्या गुन्ह्यांसाठी या आरोपींना त्यांच्याकडे वर्ग करून तपास करणे आणि गुन्हे उघडकीस आणणे हा त्यामागील मुख्य उद्देश आहे. या आरोपींना गुन्हे प्रकटीकरण विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पाहिलेले असते. त्यामुळे, गुन्हा करण्यासाठी हे आरोपी धजावत नाहीत. पोलीस ठाण्यांत दररोज अटक केलेल्या गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना सर्व अधिकाऱ्यांना दाखवून गुन्ह्यांची माहिती दिली जाते. त्यामुळे आपल्याला सर्व पोलिसांनी पाहिले आहे आणि आपण जर पुन्हा गुन्हा केला तर पकडले जाऊ, अशी आरोपींची मानसिकता होते. यातून गुन्ह्यांना प्रतिबंध व्हावा, हा त्यामागील मूळ उद्देश आहे.
शहरातील गुन्हेगारी कमी व्हावी, आरोपींवर वचक बसावा आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने ही संकल्पना राबविण्यात येत आहे. - दत्तात्रेय कराळे, अप्पर पोलीस आयुक्त, कल्याण