दोन हजारांहून जास्त पुस्तकांची देवाणघेवाण
By admin | Published: May 9, 2017 01:04 AM2017-05-09T01:04:41+5:302017-05-09T01:05:04+5:30
‘आवडलेले पुस्तक मोफत घ्या’ उपक्रमात ठाण्यात तब्बल दोन हजारांहून अधिक पुस्तकांची देवाणघेवाण झाली. दोन दिवस चाललेल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ‘आवडलेले पुस्तक मोफत घ्या’ उपक्रमात ठाण्यात तब्बल दोन हजारांहून अधिक पुस्तकांची देवाणघेवाण झाली. दोन दिवस चाललेल्या या उपक्रमाला पाचशेहून अधिक वाचकांनी भेट दिली. विशेष म्हणजे व्हीलचेअरवर येऊन पुस्तकांचा आस्वाद घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचाही यात समावेश होता.
पुस्तकांच्या देवाणघेवाणीच्या माध्यमातून वाचनाचे प्रमाण अधिक वाढते. त्यासाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठानने हा उपक्रम हाती घेतला. नाशिकला मिळालेल्या यशानंतर ठाण्यातदेखील तो राबवला गेला. ‘पुस्तक घ्यावे पुस्तक द्यावे!, अखंड वाचत जावे’ या संकल्पनेवर आधारित पुस्तकाच्या देवाणघेवाणीचा आगळावेगळा उपक्रम ठाणेकरांनी अनुभवला. विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व जण या उपक्रमाचा लाभ घेत आहेत. संस्थेचे विश्वस्त विनायक रानडे यांच्या पुढाकारातून निर्माण झालेल्या ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या वाचनचळवळीनंतर विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्यापैकी एक म्हणजे ‘आवडलेले पुस्तक मोफत घ्या’ हा उपक्रम. शनिवारी ठाण्यातील घंटाळी सहनिवास येथे शुभारंभ झाला. रविवारी वाचकांची दुप्पट गर्दी होती. पुस्तकाच्या देवाणघेवाणीसाठी लांबचलांब रांगा होत्या. या उपक्रमात पहिल्या दिवशी ८०० पुस्तके मांडण्यात आली होती. तसेच, नवीन पुस्तकांचादेखील यात समावेश होता. विशेष म्हणजे ठाण्यातील साहित्यप्रेमी भूषण कुलकर्णी आणि आनंद मराठे यांनी प्रत्येकी २५० सुस्थितीतील दर्जेदार पुस्तके योजनेसाठी भेट दिली. सर्वाधिक पुस्तके या दोघांनीच दिली असल्याचे रानडे यांनी सांगितले. वारंवार असे आयोजन करण्याची त्यांनी मागणी केली. या उपक्रमासाठी नाशिकवरून आलेले समीर देशपांडे, शैलेश नाटकर तसेच ठाण्यातील दीपक मालपुरे यांची विशेष साथ लाभल्याचे त्यांनी सांगितले.
नवीन पुस्तके, दुर्मीळ पुस्तके, मराठी, इंग्रजी, बालसाहित्य यांचे आदानप्रदान झाले. सर्व प्रकारची पुस्तके यात आली आणि गेलीही, असे रानडे यांनी सांगितले. उपक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी मधुरा बापट आणि रश्मी जोशी यांनी सांभाळली.