अवैध मद्य विक्री, निर्मितीसह वाहतूक करणाऱ्या १८० आरोपींवर उत्पादन शुल्कची ठाणे जिल्हयात कारवाई

By जितेंद्र कालेकर | Published: November 8, 2024 06:48 PM2024-11-08T18:48:35+5:302024-11-08T18:48:47+5:30

आचारसंहितेच्या २२ दिवसातील धाडसत्र: ९२ धाडींमध्ये गावठी दारुसह एक कोटींचा मुद्देमाल जप्त

Excise action in Thane district against 180 accused involved in illegal liquor sale, manufacture and transportation | अवैध मद्य विक्री, निर्मितीसह वाहतूक करणाऱ्या १८० आरोपींवर उत्पादन शुल्कची ठाणे जिल्हयात कारवाई

अवैध मद्य विक्री, निर्मितीसह वाहतूक करणाऱ्या १८० आरोपींवर उत्पादन शुल्कची ठाणे जिल्हयात कारवाई

ठाणे: विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या शीघ्र कृती दलासह (क्यूआरटी) अन्य पथकांनी गेल्या २२ दिवसांमध्ये मद्य विक्री आणि निमिर्ती करणाऱ्या १८० जणांना अटक केली. तर ९२ धाडींमध्ये गावठी दारुसह एक कोटी १२ लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती ठाणे राज्य उत्पादन शल्क विभागाचे अधीक्षक प्रविणकुमार तांबे यांनी शुक्रवारी दिली.

ठाणे जिल्हयामध्ये निवडणूकीच्या अनुषंगाने १५ ऑक्टाेंबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि अधीक्षक तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध मद्य विक्रीवर धडक कारवाई झाली. अवैध मद्याचा वापर निवडणूकीत होउ नये, यासाठी जिल्ह्यातील पडघा, मुंब्रा बायपास आणि खारघर टोल नाका या तीन ठिकाणी तपासणी नाके निर्माण केले आहेत. त्याचबरोबर क्यूआरटी पथकांचीही निर्मिती केली आहे. याठिकाणी अवैध मद्याबाबत तक्रार आल्यास त्वरित कारवाईचे आदेश दिले आहेत. ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने १५ ऑक्टाेंबर ते ६ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत २७९ गुन्हे नोंदविले.

यामध्ये बेकायदा मद्य विक्री, वाहतूक आणि निर्मिती करणाऱ्या १८० आरोपींना अटक केली. त्याचबरोबर मद्याची वाहतूक करणारी सात वाहनेही जप्त केली. आतापर्यंत गावठी मद्य, मद्य निर्मितीच्या रसायनासह एक कोटी १२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. जिल्ह्यातील अंजूर, केवणी, अलीमगर, देसाई आणि दिवा या खाडीतील हातभट्टी निर्मिती केंद्र तसेच मानेरा, द्वारली आणि घेसर या ठिकाणच्या हातभट्टी निर्मिती केंद्रांवर धाडसत्र राबविण्यात आले.

दमण- दिव, दादरा नगर हवेली आणि गोवा या परराज्यातून चोरट्या पद्धतीने येणाऱ्या मद्यावरही गुन्हे दाखल झाले आहेत. यात परराज्यातील एक हजार २४० लीटर मद्य जप्त केले आहेत. ठाणे जिल्हयातील मद्य निर्मिती केंद्र, ठोक आणि किरकोळ मद्य विक्रेते यांच्या दैनंदिन मद्य विक्रीवरही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नियंत्रण ठेवण्यात आले आहे.

निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून जशी अवैध मद्य विक्री आणि वाहतूकीवर कारवाई झाली त्याप्रमाणेच ती यापुढेही चालू राहणार आहे. परराज्यातून येणाऱ्या मद्यावरही करडी नजर राहणार आहे. अवैध मद्याबाबत तक्रार किंवा खबर असल्यास १८००२३३९९९९ या टाेल फ्री क्रमांकावर आणि व्हाट्सअप नंबर ८४२२००११३३ वर तक्रार करावी.

प्रविणकुमार तांबे, अधीक्षक , राज्य उत्पादन शुल्क विभाग, ठाणे.

Web Title: Excise action in Thane district against 180 accused involved in illegal liquor sale, manufacture and transportation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.