ठाण्यातील खाडी किनारच्या हातभट्टी दारु अड्डयांवर उत्पादन शुल्क विभागाचे धाडसत्र
By जितेंद्र कालेकर | Published: September 1, 2024 07:15 PM2024-09-01T19:15:23+5:302024-09-01T19:16:20+5:30
* अधीक्षक प्रविण तांबे यांचाही कारवाईमध्ये सहभाग: रसायनासह १३ लाख ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त
ठाणे: अलिकडेच झालेल्या पावसाचा गैरफायदा घेत ठाण्यातील खाडी किनारी पुन्हा नव्याने सुरु झालेल्या गावठी दारु निर्मितीच्या अड्डयांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे पथकांनी धडक कारवाई केली. या कारवाईमध्ये गावठी दारु निर्मितीसाठी लागणाºया रसायनासह १३ लाख ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त करुन तो नष्ट केला. नव्यानेच नियुक्त झालेले अधीक्षक प्रविण तांबे यांनीही या धाडसत्रात सहभाग घेतल्याची माहिती कोकण विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांनी रविवारी दिली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष मोहिमेंतर्गत खाडी किनारी असलेल्या अड्डयांवर ३१ आॅगस्ट रोजी धाडसत्र राबवून ही कारवाई करण्यात आली. हातभट्टीद्वारे तयार होणाºया गावठी दारूचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कोकण विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांनी विशेष धाडसत्र मोहीम सुरु केली आहे. त्याच अनुषंगाने अधीक्षक प्रविण तांबे यांच्यासह उप अधीक्षक वैभव वैद्य, अभिजित देशमुख, तसेच निरीक्षक महेश धनशेट्टी, संजय ढेरे, आनंद पवार आणि दीपक परब आदींच्या पथकांनी वडवली, आगासन, अंबरनाथ, उंबरडे, वसावली, अंजुर, आलिमघर आणि देसाई गावासह इतर ठिकाणच्या खाड़ी आणि अति दुर्गम भागात जाऊन शनिवारी दिवसभर ही कारवाई केली. या हातभट्टी दारु निर्मिती केंद्रांवरील धाडीत रसायनाने भरलेले सुमारे १८० ड्रम्स उद्ध्वस्त करण्यात आले. या कारवाईमध्ये १२ बेवारस तर एक वारसदार असलेल्यावर गुन्हे दाखल झाले असून यामध्ये ३९ हजार ५०० लीटर रसायन, तयार दारु आणि इतर सामुग्री असा १३ लाख ५६ हजारांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.
या कारवाईसाठी उत्पादन शुल्कच्या पथकांनी बोटिमधून जाऊन खाडीतील हातभट्टी निर्मिती ठिकाणे उद्ध्वस्त केली. दारू निर्मिती करणाºयांविरुद्ध दारूबंदी कायद्यानव्ये प्रतिबंधात्मक कार्यवाहीसह एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करण्याचे आदेशही यावेळी उपायुक्त पवार यांनी दिले.