उल्हासनगरातील राजकारणात खळबळ; ओमी कलानी व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चर्चा
By सदानंद नाईक | Published: October 10, 2023 02:08 PM2023-10-10T14:08:37+5:302023-10-10T14:09:41+5:30
राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर पप्पु कलानी नेमके कोणत्या गटात? असा प्रश्न विचारला जात होता. मात्र कलानी यांनी शरद पवार यांच्या सोबत राहणार असल्याचे संकेत दिले होते.
उल्हासनगर : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मध्यस्थीने ओमी कलानी, शहर जिल्हाध्यक्षा पंचम कलानी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने, कलानी कुटुंब अजित पवार गटात जाणार असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. तर ही भेट सदिच्छा असल्याची प्रतिक्रिया ओमी कलानी यांनी देऊन सर्वांना बुचकळ्यात पाडले आहे.
राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर पप्पु कलानी नेमके कोणत्या गटात? असा प्रश्न विचारला जात होता. मात्र कलानी यांनी शरद पवार यांच्या सोबत राहणार असल्याचे संकेत दिले होते. दरम्यान गणपती उत्सववेळी कलानी यांच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी युवानेते व आमदार रोहित पवार आले होते. त्यांनी कलानी कुटुंबा सोबत स्नेहभोजन केले. त्याच दिवशी अजित पवार गटाचे माजी खासदार आनंद परांजपे यांनी कलानी यांच्या बाप्पाचे दर्शन घेऊन कलानी कुटुंब सोबत चर्चा केली होती. दोन्ही नेत्यांच्या भेटीने कलानी नेमके कोणत्या गटात? असा प्रश्न विचारला जात होता.
माजी आमदार पप्पु कलानी यांचा मुलगा ओमी कलानी, शहरजिल्हाध्यक्ष व माजी महापौर पंचम कलानी यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी अजित पवार यांचे कट्टर समर्थक आनंद परांजपे उपस्थित होते. या भेटीने ओमी कलानी, पंचम कलानी यांच्यासह त्यांचे समर्थक राष्ट्रवादी अजित पवार गटात जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. कलानी कुटुंब हे अजित पवार यांच्या सोबत आल्यास, उल्हासनगर, अंबरनाथ व कल्याण पूर्व मतदारसंघासह कल्याण लोकसभा मतदारसंघावर सत्ताधारी महायुतीचा विजय निश्चित मानला जातो. उल्हासनगरसह अंबरनाथ व कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात कलानी यांना मानणारा मोठा वर्ग असून त्याचा फायदा सत्ताधारी महायुतीला होणार असल्याचे बोलले जाते.
हितर सदिच्छा भेट - ओमी कलानी
ओमी कलानी यांनी धर्मपत्नी व माजी महापौर, जिल्हाध्यक्ष पंचम कलानी यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. मात्र ही सदिच्छा भेट असल्याचे सांगून आपण राष्ट्रवादीत असल्याचे संकेत ओमी कलानी यांनी दिले.
पप्पु कलानी वेट अँड वॉचच्या भूमिकेत
शहरातील राजकारण गेली तीन दशका पासून ज्यांच्या भोवती फिरते ते माजी आमदार पप्पु कलानी यांनी या राजकीय घडामोडीवर बोलण्यास नकार दिला. मात्र ते वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत.