पालिकेच्या उद्यान अधीक्षकानेच बांधकाम विभाग व नगरसेवकाचे साटेलोटे असल्याचा प्रश्न उपस्थित केल्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2021 11:05 PM2021-01-14T23:05:59+5:302021-01-14T23:06:57+5:30
Mira Bhayander Municipal Corporation News : मीरा भाईंदर महापालिकेच्या बांधकाम विभागातील अनागोंदी वर नेहमीच आरोप व तक्रारींचा फेरा लागला असताना आता....
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या बांधकाम विभागातील अनागोंदी वर नेहमीच आरोप व तक्रारींचा फेरा लागला असताना आता पालिकेच्या उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यानेच बांधकाम विभाग व एका नगरसेवकाचे संगनमत असल्याचा मुद्दा आयुक्त, उपायुक्त आदींना दिलेल्या खुलाशात उपस्थित करून खळबळ उडवून दिली आहे . इतकेच नव्हे तर बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गेल्या १५ वर्षां पासून एकाच पदावर असल्याचे म्हटले आहे .
पेणकरपाडा येथील खोडियार चाळ व खाडी पात्र ओलांडून दहिसरच्या एन एल कॉम्प्लेक्स येथील रस्त्या साठी चक्क खाडीपात्रात पाईप व भर टाकून रस्ता बांधण्याचा प्रताप बांधकाम विभागाने चालवला . विकास आराखड्यात सदर ठिकाणी रस्ता नसताना तसेच पेणकरपाड्यात मोठी वाहतूक कोंडी या रस्त्या मुळे होण्याची शक्यता असल्याने त्याला विरोध झाला . पालिकेने सदर काम थांबवले .
दरम्यान सदर काम झाडे काढण्याची कार्यवाही उद्यान विभागाने केली नाही म्हणून काम थांबल्याचा कांगावा सुरु झाला . लोकमतने या बाबतचे वस्तुस्थिती दर्शक वृत्त दिल्या नंतर आता त्याच वृत्ताचा आधार घेत पालिकेचे प्रभारी उपमुख्य उद्यान अधीक्षक हंसराज मेश्राम यांनी बांधकाम विभाग व तक्रार करणारे नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे .
येथील दोन झाड हटवण्यासाठी बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता प्रफुल्ल वानखेडे यांच्या सोबत पाहणी करून तसा प्रस्ताव सादर केला आहे . ह्यापुढे बांधकाम विभागाने कामाची आर्थिक व प्रशासकीय मंजुरी तसेच नकाशे मंजूर करतेवेळीच बाधित झाडे काढणे साठी प्रस्ताव सादर करावा . जेणे करून वृक्ष प्राधिकरण समितीची मान्यता घेण्याची कार्यवाही होऊन कामास विलंब होणार नाही असे मेश्राम यांनी सुचवले आहे .
सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता दीपक खांबित व उप अभियंता यतीन जाधव हे एकाच विभागात १५ वर्षां पासून काम करत आहेत . ध्रुवकिशोर पाटील यांनी केलेल्या तक्रारी वरून सदर अधिकारी लोकप्रतिनिधी व ठेकेदार यांच्याशी कामे वाटप करून संगनमताने उद्यान विभागाच्या विरोधात खोट्या तक्रारी करत असल्याचे स्पष्टपणे दिसत असल्याचे मेश्राम यांनी उपायुक्तांसह संबंधितांना पाठवलेल्या खुलाशात म्हटले आहे .